संघमंचावरुन मुखर्जी देणार धर्मनिरपेक्षतेचा संदेश ?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 5, 2018 09:03 PM2018-06-05T21:03:30+5:302018-06-05T21:30:21+5:30
माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या तृतीय वर्ष वर्गाच्या समारोप कार्यक्रमाला मुख्य अतिथी म्हणून उपस्थित राहणार हे निश्चित झाले आहे. देशातून मुखर्जी यांच्या उपस्थितीला धर्मनिरपेक्ष विचारशक्तींकडून विरोध होत असून ते संघस्थानी नेमके काय बोलतात याकडे देशातील राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. मुखर्जी यांचा स्पष्टवक्तेपणा, संयम व एकूण आलेख लक्षात घेता ते संघावर थेट टीका करण्यापेक्षा धर्मनिरपेक्षतेवर आधारित उद्बोधनाच्या माध्यमातून संघाचे कान टोचण्याची शक्यता आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जीराष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या तृतीय वर्ष वर्गाच्या समारोप कार्यक्रमाला मुख्य अतिथी म्हणून उपस्थित राहणार हे निश्चित झाले आहे. देशातून मुखर्जी यांच्या उपस्थितीला धर्मनिरपेक्ष विचारशक्तींकडून विरोध होत असून ते संघस्थानी नेमके काय बोलतात याकडे देशातील राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. मुखर्जी यांचा स्पष्टवक्तेपणा, संयम व एकूण आलेख लक्षात घेता ते संघावर थेट टीका करण्यापेक्षा धर्मनिरपेक्षतेवर आधारित उद्बोधनाच्या माध्यमातून संघाचे कान टोचण्याची शक्यता आहे.
संघाच्या निमंत्रणाचा प्रणव मुखर्जी यांनी स्वीकार केल्यानंतर देशात राजकीय खळबळ उडाली. कॉंग्रेससह विविध विरोधी पक्षांच्या नेत्यांंनी मुखर्जी यांच्या या निर्णयाबाबत आश्चर्य व्यक्त केले, तर काही जणांनी त्यांनी कार्यक्रमाला जाऊ नये, अशी विनंती करणारे पत्रदेखील लिहीले. मी सध्या काहीच बोलणार नाही, जे काही बोलायचे ते नागपुरातच बोलेन, असे मुखर्जी यांनी स्पष्ट केले. अशा स्थितीत ७ जून रोजी सायंकाळी ६.३० वाजता रेशीमबाग मैदानावर प्रणव मुखर्जी नेमके काय भाष्य करतात, याकडे राजकीय, सामाजिक वर्तुळाचे लक्ष आहे. याबाबत अनेक चर्चांनादेखील उधाण आले आहे.
कॉंग्रेसच्या मुशीतून घडलेले प्रणव मुखर्जी यांनी राजकीय संन्यास घेतला असला तरी त्यांची विचारधारा मात्र कायम आहे. राजकीय प्रवासादरम्यान मुखर्जी यांनी अनेकदा संघाची भूमिका व विचारसरणीवर थेट प्रहार केला आहे. अगदी संघाला मिथ्या, खोटारडी व जातीय संघटना असून समाजात भ्रम पसरविण्यासाठीच ते कार्य करत आहेत, या शब्दांत त्यांनी संघावर टीकास्त्र सोडले होते. मात्र आता परिस्थिती बदललेली आहे. देशासह विविध राज्यांमध्ये संघाचे प्राबल्य वाढले आहे. प्रणव मुखर्जी यांचे व्यक्तिमत्त्व लक्षात घेता संघाचे आमंत्रण स्विकारले असल्याने ते सौजन्य नक्कीच पाळतील व संघाच्या मंचावरुन थेट टीका करणे टाळण्यावर त्यांचा भर असेल. मात्र संघाच्या कार्यप्रणालीतील त्रुटी, विचारधारेतील कमतरता यावर मात्र ते निश्चितच भाष्य करतील, असा अंदाज संघवर्तुळातदेखील बांधल्या जात आहे.
मुखर्जींची भूमिका राहणार काय ?
कार्यक्रमस्थळी येण्याअगोदर प्रणव मुखर्जींचे संघ स्मृतिमंदिरात स्वागत करण्यात येईल. याच परिसरात आद्य सरसंघचालक डॉ.केशव बळीराम हेडगेवार व द्वितीय सरसंघचालक गोळवलकर गुरुजी यांचे समाधीस्थळ आहे. संघाच्या परंपरेनुसार कार्यक्रमाअगोदर अतिथींसमवेत संघ पदाधिकारी समाधीस्थळाचे दर्शन घेतात. त्यामुळे प्रणव मुखर्जी यांनादेखील ही विनंती करण्यात येईल हे निश्चित. अशा स्थितीत ते समाधीस्थळी नमन करतील हा हादेखील एक मोठा प्रश्न आहे.
बुधवारी प्रणव मुखर्जींचे नागपुरात आगमन
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या तृतीय वर्ष वर्ग समारोपाच्या कार्यक्रमाला माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी मुख्य अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत. मुखर्जी यांचे बुधवारी शहरात आगमन होणार असून शुक्रवार ८ जूनपर्यंत ते नागपुरात राहणार आहेत, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.
मुखर्जी यांचे बुधवारी सायंकाळी ४.५० वाजता डॉ.बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर आगमन होईल. तेथून ते थेट राजभवनकडे जातील व तेथेच त्यांचा मुक्काम असेल. ७ जून रोजी कार्यक्रम झाल्यानंतरदेखील त्यांचा राजभवनात मुक्काम असेल. ८ जून रोजी दुपारी १ वाजता ते नागपूरहून विमानाने नवी दिल्लीकडे जातील.
संघस्थानी करणार भोजन
गुरुवार ७ जून रोजी सायंकाळी ५ वाजता ते राजभवनहून रेशीमबागकडे निघतील. रेशीमबाग स्मृतिमंदिरात पोहोचल्यानंतर संघ पदाधिकाऱ्यांची भेट घेऊन ते कार्यक्रमस्थळी येतील. रेशीमबागेत प्रणव मुखर्जी चार तास राहणार आहेत. रात्री ९.३० वाजता ते तेथून राजभवनकडे प्रस्थान करतील. यादरम्यान, ते संघस्थानीच भोजनदेखील करण्याची शक्यता असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
कार्यक्रमाला ‘व्हीव्हीआयपी’ राहणार
दरम्यान, संघ शिक्षा वर्गाच्या समारोपाच्या कार्यक्रमाला देशभरातील विविध प्रांतांमधून मान्यवरांना बोलविण्यात आले आहे. यात अनेक ‘व्हीव्हीआयपी’देखील राहणार आहेत. देशातील आघाडीचे उद्योजक, सामाजिक क्षेत्रातील व्यक्ती तसेच राजकारण्यांचादेखील समावेश असेल, अशी माहिती सूत्रांनी दिली.