मुक्तिबोधांनी व्यापकतेने मार्क्सवादी दृष्टीचा आविष्कार केला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 20, 2021 04:10 AM2021-01-20T04:10:30+5:302021-01-20T04:10:30+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : वडील बंधू गजानन माधव मुक्तिबोध यांच्या वाङ्मय विचारांचा संस्कार आणि दुसरीकडे राजकीय व सामाजिक ...
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : वडील बंधू गजानन माधव मुक्तिबोध यांच्या वाङ्मय विचारांचा संस्कार आणि दुसरीकडे राजकीय व सामाजिक विचारसरणी म्हणून मार्क्सवादी दर्शनाचा संस्कार शरच्चंद्र यांच्यावर होत होता आणि त्याच जाणिवेतून पुढे त्यांनी आपल्या कवितातून व्यापकतेने मार्क्सवादी दृष्टीचा आविष्कार केल्याचे मत शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूरच्या मराठी विभागाचे प्रमुख डॉ. रणधीर शिंदे यांनी व्यक्त केले.
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या स्नातकोत्तर मराठी विभाग व विदर्भ साहित्य संघाच्या वतीने आयोजित प्रा. शरच्चंद्र मुक्तिबोध जन्मशताब्दी सोहळ्यात ‘मुक्तिबोधांची कविता’ या विषयावर शिंदे भाष्य करत होते. हा कार्यक्रम आभासी माध्यमाद्वारे पार पडला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नागपूर विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुभाष चौधरी होते तर प्रमुख पाहुणे म्हणून विदर्भ साहित्य संघाचे अध्यक्ष मनोहर म्हैसाळकर उपस्थित होते.
‘मळवाट’ हा मुक्तिबोधांचा पहिला काव्यसंग्रह. पुढे याच काव्यसंग्रहाची पुढची आवृत्ती ‘नवी मळवाट’ प्रकाशित झाली. या काव्यसंग्रहात त्यांनी अतिशय मर्मग्राही, साक्षेपी आणि मराठी कवितेतील प्रवाहांचा अंतर्गत वेध घेणारी कविता त्यांनी लिहिली. या काव्यसंग्रहाच्या प्रस्तावनेत त्यांनी बहुजन समाजाच्या स्वातंत्र्यातूनच मानवता आणि व्यक्तिस्वातंत्र्य सिद्ध होणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे. त्यानंतर त्यांनी ‘यात्रिक’ हे काव्यसंग्रह लिहिले आणि ‘सत्याची जात’ हे काव्यसंग्रह त्यांच्या मरणोत्तर प्रकाशित झाल्याचे रणधीर शिंदे यांनी सांगतले. मार्क्सवादाला आत्मसात केल्याशिवाय पुढे जाताच येणार नाही, अशी त्यांची ठाम समजूत होती, असेही शिंदे यावेळी म्हणाले. कार्यक्रमाची भूमिका मराठी विभाग प्रमुख डॉ. प्रमोद मुनघाटे यांनी स्पष्ट केली. प्रास्ताविक व परिचय डॉ. राजेंद्र नाईकवाडे यांनी केला. संचालन डॉ. अमृता इंदूरकर यांनी केले.
..........