मुंबई आणि दिल्लीच्या भामट्यांनी केली नागपुरात घरफोडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 24, 2021 04:10 AM2021-02-24T04:10:00+5:302021-02-24T04:10:00+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर - मुंबई आणि दिल्लीच्या भामट्यांनी नागपुरात येउन घरफोडी केली आणि पावणेपाच लाखाचा ऐवज चोरून नेला. ...
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर - मुंबई आणि दिल्लीच्या भामट्यांनी नागपुरात येउन घरफोडी केली आणि पावणेपाच लाखाचा ऐवज चोरून नेला. मात्र, पोलिसांनी अवघ्या तीन दिवसात आरोपींचा छडा लावून मुंबईच्या दोन भामट्यांच्या मुसक्या बांधल्या. दीपक राजेंद्र पिहाळ (वय४०, रा. मुलुंड, मुंबई) तसेच आझाद राजेश जैनवल (वय ३१, रा. ठाणे) अशी अटकेतील भामट्यांची नावे असून, त्यांच्या दिल्लीतील सिराज मलिक तसेच टुकटुक नामक साथीदारांचा पोलीस शोध घेत आहेत.
प्रतापनगरातील पायोनियर सोसायटीत राहणाऱ्या पद्मा तिवारी यांची बहीण ज्योत्स्नाची प्रकृती बिघडल्याने शुक्रवारी दुपारी त्या प्रतापनगरातील एका हॉस्पिटलमध्ये गेल्या होत्या. परत आल्या तेव्हा त्यांना दाराचे कुलूप तुटून दिसले. चोरट्यांनी ६० हजाराची रोकड तसेच सोन्याचे दागिने असा एकूण ४ लाख ७५ हजाराचा ऐवज लंपास केला होता. पद्मा यांनी प्रतापनगरात तक्रार नोंदविली. पोलिसांनी गुन्हा दाखल केला. या गुन्ह्याचा समांतर तपास गुन्हे शाखा युनिट-१च्या पथकाने सुरू केली. परिसरातील सीसीटीव्हीत एमएच ०१- एएच ५६५० क्रमांकाच्या कारचा धागा पोलिसांना सापडला. त्याआधारे पोलिसांनी गोधनी मार्गावर धाव घेऊन आरोपी दीपक पिहाळ आणि आझाद जैनवल या दोघांना जेरबंद केले.
आरोपी आझादची सासूरवाडी नागपुरात आहे. येथे तो त्याच्या गुन्हेगार मित्रांसोबत काही दिवसापूर्वी आला होता. त्याने आपल्या मेव्हण्याची कार घेऊन प्रतापनगरात तिवारी यांच्या घरी घरफोडी केली. भरदिवसा ही घरफोडी करून त्यांनी साळसूदपणे माल खिशात तर कार मेव्हण्याच्या घरी नेऊन ठेवली. मात्र, गुन्हे शाखेच्या युनिट-१च्या पथकाने तेवढ्याच शिताफीने त्यांचा छडा लावून त्यांच्याकडून कार, रोख १४ हजार, छऱ्याची गन जप्त केली. दागिने आणि रोकड घेऊन पळून गेलेल्या सिराज आणि टुकटुकचा पोलीस शोध घेत आहेत.
----