मूल्यांकनासाठी मुंबईचे नागपूरला साकडे
By admin | Published: July 5, 2017 01:44 AM2017-07-05T01:44:51+5:302017-07-05T01:44:51+5:30
मुंबई विद्यापीठाच्या तृतीय वर्षाच्या अभ्यासक्रमांचे निकाल रखडले असून लाखो उत्तरपत्रिकांचे मूल्यांकन प्रलंबित आहे.
निकाल लावण्यात नागपूर विद्यापीठाला मागितली मदत
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : मुंबई विद्यापीठाच्या तृतीय वर्षाच्या अभ्यासक्रमांचे निकाल रखडले असून लाखो उत्तरपत्रिकांचे मूल्यांकन प्रलंबित आहे. या स्थितीतून बाहेर पडण्यासाठी मुंबई विद्यापीठाच्या अधिकाऱ्यांनी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या अधिकाऱ्यांना मदत मागितली असल्याची माहिती सूत्रांनी दिली. नागपूर विद्यापीठाने परीक्षा प्रणालीत सुधारणा करत निकालांचा वेग प्रचंड प्रमाणात वाढविला आहे हे विशेष.
मुंबई विद्यापीठाचे निकाल रखडल्यामुळे विद्यार्थ्यांची प्रचंड अडचण होत आहे. उत्तरपत्रिकांचे मूल्यांकनच झाले नसल्याची बाब समोर आली आहे. मुंबई विद्यापीठाप्रमाणे नागपूर विद्यापीठातदेखील ‘आॅनस्क्रीन’ मूल्यांकन करण्यात येते. नागपूर विद्यापीठाचा ‘पॅटर्न’ जाणून घेण्यासाठी राज्यातील काही विद्यापीठांनी परीक्षा विभागाला भेटी दिल्या होत्या व प्रक्रिया जाणून घेतली होती.
नागपूर विद्यापीठाच्या बहुतांश परीक्षांचे निकाल (सुमारे १०००) ३० जूनअगोदर जाहीर झाले. नागपूर विद्यापीठाकडून निकालासंदर्भात काही मार्गदर्शन व मदत मिळू शकते का याची चाचपणी करण्यासाठी तेथील कुलगुरू डॉ. संजय देशमुख दोन आठवड्यांअगोदर नागपुरात आले होते. मात्र कुलगुरू डॉ.सिद्धार्थविनायक काणे व प्र-कुलगुरू डॉ.प्रमोद येवले हे दोघेही नसल्यामुळे चर्चा होऊ शकली नाही.
मागील आठवड्यात मुंबई विद्यापीठाचे परीक्षा नियंत्रक व परीक्षा विभागातील अधिकारी नागपूर विद्यापीठात आले होते. त्यांनी वेगाने निकाल कसे लागतात हे जाणून घेतले व नागपूर विद्यापीठ काही मदत करु शकेल का, अशी विचारणा केली. मात्र मुंबईसारख्या नामांकित विद्यापीठाने इतर विद्यापीठांकडून मूल्यांकन करवून घेणे योग्य वाटणार नाही. त्यापेक्षा ‘आॅ़नस्क्रीन’ला बाजूला सारुन थेट उत्तरपत्रिकांचे मूल्यांकन सुरू करून द्या, असा सल्ला देण्यात आला असल्याची माहिती सूत्रांनी दिली. याबाबत प्रतिक्रियेसाठी कुलगुरू डॉ.सिद्धार्थविनायक काणे यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.