नागपूरच्या ‘निर्मिती’ला मुंबई फिल्म फेस्टीव्हलचा मानाचा पुरस्कार

By आनंद डेकाटे | Published: May 26, 2024 08:35 PM2024-05-26T20:35:08+5:302024-05-26T20:35:38+5:30

ठरली उत्कृष्ठ महिला दिग्दर्शक; विदर्भाच्या मुलीला पहिल्यांदाच मिळाला बहुमान

Mumbai Film Festival Honorable Mention Award for Nagpur Nirmati Jivantare | नागपूरच्या ‘निर्मिती’ला मुंबई फिल्म फेस्टीव्हलचा मानाचा पुरस्कार

नागपूरच्या ‘निर्मिती’ला मुंबई फिल्म फेस्टीव्हलचा मानाचा पुरस्कार

नागपूर : उपराजधानीत तयार झालेली 'आबरू' या लघू चित्रपटाच्या दिग्दर्शक निर्मिती जीवनतारे यांना मुंबई एंटरटेंमेंटमेंट इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल मध्ये यावर्षीचा उत्कृष्ट महिला दिग्दर्शक हा पुरस्कार घोषित करण्यात आला आहे. हा प्रतिष्ठेचा पुरस्कार मिळविणारी निर्मिती ही विदर्भातील पहिलीच दिग्दर्शक आहे. २४ वर्षीय निर्मिती ला नाट्यकलेचे बालकडू घरुनच मिळाले आहे. अवघ्या बारा वर्षाची असताना तिने महासम्राट अशोक या महानाट्यात मध्यवर्ती भूमिका केली होती. या महानाट्याचा प्रयोग कर्नाटकात सादर झाला होता. व्हीएमव्ही कॉलेजमध्ये शिकत असताना थिएटर अँड आर्ट पदवी अभ्यासक्रम करताना बादल सरकार यांच्या 'सुरज का सातवा घोडा', पराग घोंगे यांच्या 'मानसीचा शिल्पकार तो' , प्रभाकर दुपारे यांच्या 'स्मशान', रमेश लकमापुरे यांच्या 'गाडगेबाबा' या नाटकातून अभिनयाची छाप सोडली. याशिवाय दादाकांत धनविजय यांच्या 'गुलसिता' या लघू चित्रपटात सहाय्यक दिग्दर्शक म्हणूनही तिने काम केले आहे. प्रमोद काळबांडे लिखित ' संविधान ' या एकपात्री नाट्याचे अनेक प्रयोग केले.

उपराजधानीतील नाट्य क्षेत्र गाजविल्यानंतर पुढील शिक्षणासाठी निर्मिती केरळ येथील एल. व्ही. प्रसाद फिल्म इन्स्टिट्यूटमध्ये फिल्म मेकिंग कोर्स पूर्ण केला. यात दिग्दर्शन म्हणून स्पेशलायझेशन कोर्स केला. यादरम्यान ‘आबरु’ हा लघुपट पूर्ण केला. या चित्रपटाला उत्कृष्ट महिला दिग्दर्शकाचा पुरस्कार मिळाला. येत्या २२ जून रोजी मुंबई येथे होणाऱ्या समारंभात मान्यवरांच्या हस्ते तिला सन्मानित करण्यात येणार आहे. याशिवाय पुणे शॉर्ट फिल्म फेस्टिव्हल मध्ये आबरू या लघुपटाची निवड झाली असून, तीन जूनला या लघुपटाचे सादरीकरण पुण्यातच होणार आहे.

‘मी तयार केलेल्या 'आबरू' या लघू चित्रपटासाठी उत्कृष्ट महिला दिग्दर्शकाचा पुरस्कार मिळणे, ही माझ्यासाठी आनंद व अभिमानाची गोष्ट आहे. यामुळे केवळ माझा तर आत्मविश्वास वाढणार आहेच, शिवाय नागपूर व विदर्भातील नाट्यक्षेत्रात काम करणाऱ्या इतरही कलावंतांना विशेषतः तरुणांना मोटिव्हेशन मिळणार आहे,' असे सिने दिग्दर्शका निर्मिती जीवनतारे यांनी म्हटलं.
 

Web Title: Mumbai Film Festival Honorable Mention Award for Nagpur Nirmati Jivantare

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.