-तर मुंबई घटनेसारखी नागपुरातही पुनरावृत्ती?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 19, 2018 10:12 AM2018-12-19T10:12:40+5:302018-12-19T10:15:09+5:30
मुंबईच्या अंधेरी मरोळ येथील कामगार रुग्णालयाला लागलेल्या आगीत आठ जणांचा मृत्यू झाला, तर १५७ जण जखमी झाले. नागपूरच्या सोमवारीपेठेतील कामगार रुग्णालयातही या घटनेची पुनरावृत्ती होण्याची शक्यता आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : मुंबईच्या अंधेरी मरोळ येथील कामगार रुग्णालयाला लागलेल्या आगीत आठ जणांचा मृत्यू झाला, तर १५७ जण जखमी झाले. नागपूरच्या सोमवारीपेठेतील कामगार रुग्णालयातही या घटनेची पुनरावृत्ती होण्याची शक्यता आहे.
या रुग्णालयातही ये-जा करण्यासाठी एकच मार्ग आहे. ‘रॅम्प’ नाहीत. अरुंद पायऱ्या आहेत. रुग्णालयाचे नूतनीकरणाचे काम सुरू आहे. दुसऱ्या मजल्यावर मोठ्या संख्येत गाद्या, रद्दी पेपर, फाईल्सचा ढीग व भंगार साहित्य पडून आहेत. येथील विद्युत व्यवस्थाही योग्य पद्धतीची नाही. आग विझवण्यासाठी सक्षम यंत्रणा नाही. रुग्णालयात समाजविघातकांचा वावर असल्याने मोठ्या धोक्याची शक्यता वर्तवली जात आहे.
अग्निशमन विभागाच्या रुग्णालयांसाठी अग्निशमन यंत्रणा लावण्याबाबत स्पष्ट सूचना आहेत. कायद्यानुसार १५ मीटरपेक्षा उंच व ५० खाटांच्या रुग्णालयामध्ये ‘आॅटोमॅटिक हिट डिटेक्टर’, ‘हॉजव्हील’, ‘फायर अलार्म सिस्टीम’, ‘वेटराईजर’, भूमिगत पाण्याची टाकी असणे आवश्यक आहे. आपत्कालीन स्थितीत उपचार घेणाºया रुग्णांना कमीत कमी वेळेत इमारतीतून बाहेर काढता यावे यासाठी विशेष उपाययोजना क्रमप्राप्त आहे. परंतु दोन मजल्याच्या कामगार रुग्णालयात अशी कोणतीच व्यवस्था नाही. प्रत्येक माळ्यावर एक-एक व तळमजल्यावर दोन ते चार अग्निशमन उपकरण बसवून अग्निशमन विभागाच्या अटींकडे दुर्लक्ष केल्याचे दिसून येते.
कुणीही या-कुणीही जा
‘लोकमत’ प्रतिनिधीने मुंबई घटनेच्या धर्तीवर या रुग्णालयाची पाहणी केली असता आगीसारख्या घटनेसाठी तातडीने विविध उपाययोजना करण्याची गरज असल्याचे दिसून आले. कामगार रुग्णालयाच्या नूतनीकरणाचे काम सुरू आहे. दुसऱ्या मजल्यावरील वॉर्ड क्र. पाच व सहामध्ये भंगार साहित्य पडून आहे. विशेषत: मोठ्या संख्येत गाद्यांचा ढीग, रद्दी कागद, फाईल्सचा खच पडला आहे. रुग्णालयाच्या प्रवेशद्वारावर सुरक्षा रक्षक राहत नसल्याने कुणीही ये-जा करू शकतात. समाजविघातकांचा रुग्णालयात वावर असल्याचेही दिसून आले. अशावेळी दुसऱ्या मजल्यावरील गाद्यांना कुणी आग लावल्यास मोठी हानी होण्याची शक्यता आहे.
अरुंद पायऱ्या व खिडक्यांवर काचेचे तावदान
रुग्णालयात १३० खाटांची सोय आहे. पहिल्या मजल्यावरील वॉर्डात रुग्णांना ठेवले जाते. परंतु येथे जाण्यासाठी एकमेव पायऱ्यांचा अरुंद मार्ग आहे. येथे ‘रॅम्प’ नाहीत. पायऱ्यांच्या मार्गावरील खिडक्यांना काचेचे तावदान लावून बंद करण्यात आल्या आहेत. यामुळे आकस्मिक घटनेत रुग्णांना दुसऱ्या ठिकाणी हलविणे अडचणीचे आहे. शिवाय, धूर कोंडण्याचीही शक्यता आहे.
एकच प्रवेशद्वार
मुंबईप्रमाणे या रुग्णालयातही एकच प्रवेशद्वार आहे. मागील भागात एक दार आहे. परंतु ते नेहमी कुलूपबंद असते. रुग्णालयात मोजकीच अग्निशमन उपकरणे आहेत. त्याचे प्रशिक्षणही कर्मचाऱ्यांना देण्यात आले नसल्याचे समजते.