मुंबई-नागपूर महामार्गाने राज्यातील २४ जिल्हे जेएनपीटीशी जोडणार- मुख्यमंत्री
By ऑनलाइन लोकमत | Published: November 24, 2018 03:01 AM2018-11-24T03:01:11+5:302018-11-24T03:01:34+5:30
मुंबई-नागपूर समृद्धी महामार्ग हा जगातील सर्वोत्कृष्ट महामार्ग बनविण्याचे प्रयत्न सुरू आहेत. जगातील सर्वोत्कृष्ट तंत्रज्ञान या महामार्गासाठी वापरले जात आहे.
नागपूर : मुंबई-नागपूर समृद्धी महामार्ग हा जगातील सर्वोत्कृष्ट महामार्ग बनविण्याचे प्रयत्न सुरू आहेत. जगातील सर्वोत्कृष्ट तंत्रज्ञान या महामार्गासाठी वापरले जात आहे. या महामार्गाने २२ नोड्सच्या माध्यमातून २४ जिल्हे जेएनपीटीशी जोडण्यात येतील, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येथे दिली.
इंडियन रोड काँग्रेसचे औपचारिक उद्घाटन करताना ते बोलत होते. मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, भौतिक आणि व्हर्च्युअल गोष्टींना जोडून भविष्यात रस्ते व पुलांची निर्मिती शक्य आहे. मात्र, स्मार्ट, सस्टेनेबल आणि सेफ हा त्या पुलांच्या निर्मितीचा आधार असावा. आपण तंत्रज्ञानाचा जेवढा वापर करू तेवढे उत्कृष्टतेचे निकष पूर्ण करू शकू. प्रकल्पांचा डीपीआर तयार करताना तंत्रज्ञानाचा वापर केला तर आपल्याला खऱ्या अर्थाने अचूक डीपीआर तयार करता येईल. त्यामुळे डीपीआर निर्मितीमध्ये तंत्रज्ञानाचा वापर करण्यावर भर देण्याचा आग्रहही त्यांनी केला. तसेच या अधिवेशनात ज्या १५ कोडचे उद्घाटन झाले, त्या सर्वांचा एक इंटिग्रेटेड प्लॅटफॉर्म तयार करून डीपीआर निर्मितीमध्ये या कोडचा व नवनवीन तंत्रज्ञानाचा समावेश व्हावा. तसेच आधुनिक, अद्ययावत, शाश्वत, स्वयंपूर्ण व सुरक्षित रस्ते बांधणीवर भर देण्याचे आव्हान बांधकाम क्षेत्रातील अभियंत्यांनी स्वीकारावे, असे आवाहनही मुख्यमंत्री फडणवीस यांनी केले.
ज्ञानाचे समृद्धीत रूपांतरण हेच भविष्य असून आमच्या सरकारने पायाभूत सुविधांना प्राधान्य दिले आहे. विज्ञान, संशोधन, व्यावसायिकता, कौशल्ये या गोष्टींवर भर देण्याचा सल्लाही या वेळी गडकरी यांनी दिला. सोबतच पायाभूत सुविधांचा खर्च कमी करण्यावर भर देताना गुणवत्ताही कायम ठेवणे आवश्यक असल्याचे केंद्रीय भूपृष्ठ रस्ते वाहतूक व जहाजबांधणी मंत्री नितीन गडकरी यांनी म्हटले.
रस्ते सुरक्षेसंंबंधी संवेदनशीलता हवी - गडकरी
भारतात रस्ते अपघातात मृत पावणाºयांची संख्या सर्वाधिक आहे. त्यामध्ये १८ ते ३५ वयोगटातील तरुणांची संख्या मोठी आहे. शिवाय तीन लाख लोकांना रस्ते अपघातात अपंगत्व येते. याचा दोष केवळ नशिबाला देता कामा नये. कारण अनेक घटना या रस्ते अभियांत्रिकीमधील चुकांमुळे होतात. चुकीचा डीपीआरही याला जबाबदार आहे. त्या अनुषंगाने रस्तेनिर्मिती व बांधणीतील सर्व संबंधित विभागांनी संवेदनशील असावे. या संवेदनशीलतेमुळे अनेक जीव वाचवता येतील, असे मत गडकरी यांनी व्यक्त केले.