मुंबई, पुणे, हैदराबाद ‘नो वेटिंग’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 26, 2021 04:08 AM2021-03-26T04:08:10+5:302021-03-26T04:08:10+5:30
नागपूर : कोरोनामुळे अनेक प्रवासी प्रवासाचा बेत रद्द करीत आहेत. त्यामुळे रेल्वेगाड्यात बर्थ सहज उपलब्ध होत आहेत. कोरोनाची लाट ...
नागपूर : कोरोनामुळे अनेक प्रवासी प्रवासाचा बेत रद्द करीत आहेत. त्यामुळे रेल्वेगाड्यात बर्थ सहज उपलब्ध होत आहेत. कोरोनाची लाट संपेपर्यंत हीच परिस्थिती राहणार आहे. मुंबई, पुणे आणि हैदराबादला जाणाऱ्या रेल्वेगाड्यात वर्षभर वेटिंगची स्थिती असते. परंतु कोरोनाचे रुग्ण वाढत असल्यामुळे अनेक प्रवासी प्रवास करणे टाळत आहेत. त्यामुळे मुंबई, पुणे आणि हैदराबादला जाणाऱ्या रेल्वेगाड्यात सहज बर्थ उपलब्ध होत आहेत. परंतु गोरखपूर, दानापूर, पाटणा, हावडा या मार्गावरील रेल्वेगाड्यात प्रवाशांची गर्दी असल्यामुळे या गाड्यात वेटिंगची स्थिती आहे.
कोरोनामुळे नियमित रेल्वेगाड्या बंद करण्यात आल्या आहेत. परंतु रेल्वे बोर्डाने प्रवाशांच्या सुविधेसाठी विशेष रेल्वेगाड्या चालविण्याचा निर्णय घेतलेला आहे. कोरोनाच्या पूर्वी रेल्वेस्थानकावरून जवळपास १२५ रेल्वेगाड्या धावत होत्या. या गाड्यांमधून ३० हजार प्रवासी प्रवास करीत होते. परंतु सध्या नागपूर रेल्वेस्थानकावरून ८० रेल्वेगाड्या धावत आहेत. या रेल्वेगाड्यांमधून १२ हजार प्रवासी प्रवास करीत असल्याची माहिती रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी दिली.
मे महिन्यातही बर्थ उपलब्ध
एप्रिल महिन्यात मुलांच्या परीक्षा आटोपतात. त्यामुळे अनेक पालक बाहेरगावी फिरायला जाण्याचा बेत आखतात. त्यासाठी तीन महिन्यापूर्वीच मे महिन्यातील रेल्वेगाड्या फुल्ल होत असतात. परंतु सगळीकडे कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यामुळे सध्यातरी अनेक पालकांनी रेल्वेचे आरक्षण केलेले नाही. त्यामुळे मे महिन्यात मुंबई, पुणे, दिल्ली, मद्रास येथील रेल्वेगाड्यात बर्थ उपलब्ध आहेत. कोरोनाच्या रुग्णांची संख्या कमी झाल्यानंतर मे महिन्यातील आरक्षण फुल्ल होणार असल्याची माहिती रेल्वेच्या सूत्रांनी दिली.
प्रोटोकॉल पाहून प्रवासाचा निर्णय
कोरोनामुळे वेगवेगळ्या राज्यात वेगवेगळे नियम लागू करण्यात आले आहेत. प्रवाशांना काही राज्यात कोरोनाची टेस्ट करणे बंधनकारक आहे. त्यामुळे कोरोनाचा प्रोटोकॉल पाहून प्रवासी प्रवासाचे नियोजन करीत आहेत.
-एस.जी. राव. जनसंपर्क अधिकारी, मध्य रेल्वे, नागपूर विभाग
...............