मुंबईतील आमिर शाहरुखच्या मदतीने करतो एमडीची तस्करी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 3, 2020 04:17 AM2020-12-03T04:17:50+5:302020-12-03T04:17:50+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : ड्रग नेटवर्कशी कनेक्ट असल्याच्या संशयामुळे बॉलिवूडमधील आघाडीची अभिनेत्री दीपिका पदुकोण, रिया चक्रवर्तीसह फिल्म इंडस्ट्रीतील ...

Mumbai's Aamir smuggles MD with the help of Shah Rukh | मुंबईतील आमिर शाहरुखच्या मदतीने करतो एमडीची तस्करी

मुंबईतील आमिर शाहरुखच्या मदतीने करतो एमडीची तस्करी

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : ड्रग नेटवर्कशी कनेक्ट असल्याच्या संशयामुळे बॉलिवूडमधील आघाडीची अभिनेत्री दीपिका पदुकोण, रिया चक्रवर्तीसह फिल्म इंडस्ट्रीतील अनेक तारे-तारकांची प्रदीर्घ चौकशी करून एनसीबीने बॉलिवूडमधील अनेकांना दिवसा तारे दाखविले. त्यामुळे मुंबईतील ड्रग माफियांनी नागपूरच्या माध्यमातून मध्य भारतावर लक्ष केंद्रित केले आहे. मुंबईतील आमिर खान अतिक खान शाहरुख आणि पक्याच्या मदतीने नागपुरातील आमिर मुलानीला नियमित लाखोची एमडी पाठवीत आहे. पोलीस तपासात झालेल्या या धक्‍कादायक खुलाशामुळे नशा बाजार चालविणाऱ्यांचे नेटवर्क पुन्हा नागपूर विदर्भात स्ट्राँग झाल्याची माहिती पुढे आली आहे.

गुन्हे शाखेच्या एनडीपीएस पथकाने शनिवारी २५६ तर रविवारी १३५ ग्राम एमडी जप्त करून, पाच ड्रग सप्लायर ताब्यात घेतले. सध्या ते पोलीस कोठडीत असून त्यांच्याकडून मिळालेल्या माहितीमुळे नागपूर मध्य भारतातील नशा बाजार पुन्हा गरम झाल्याची माहिती पुढे आली आहे.

सूत्रांच्या माहितीनुसार, मुंबईच्या आमिर खान अतिक खान आणि नागपुरातील मोहम्मद आमिर मुलानी या दोघांनी संगनमत करून एमडीच्या तस्करीत अनेकांना गुंतविले आहे. लॉकडाऊनमुळे अवघे जग ठप्प झाले असताना नशेचा धंदा जोरात सुरू होता. कधी ॲम्ब्युलन्सचा तर कधी खासगी वाहनांचा वापर करून मुंबईहून नागपुरात लाखोची एमडी आणली जात होती. येथील पोलिसांनी अत्यंत सूक्ष्म अभ्यास करून नशा बाजार गरम करणाऱ्या तस्करांना पकडले. त्यांना कारागृहात डांबले. त्यामुळे ड्रग माफियांनी नवे तंत्र शोधले. त्यांनी पकडले जाण्याचा धोका टाळण्यासाठी कुरियरच्या माध्यमातून एमडीची तस्करी सुरू केली. गिफ्ट बॉक्स, मेडिसिन बॉक्स, चॉकलेट आणि बिस्कीट यांच्या बॉक्समधून एमडीची खेप पाठविली जाऊ लागली. पोलीस आयुक्त अमितेशकुमार, अतिरिक्त आयुक्त सुनील फुलारी, उपायुक्त गजानन राजमाने आणि सहायक आयुक्त सुधीर नंदनवार यांच्या मार्गदर्शनाखाली एनडीपीएसचे सार्थक नेहते आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी शनिवारी आणि रविवारी सलग दोन दिवस नागपुरात आलेली तब्बल १५ लाखाची एमडी जप्त केली. सोबतच पाच ड्रग्स स्मगलर्स पकडून ड्रग माफियांची डावबाजी उधळून लावली. ते सध्या कस्टडीत असून त्यांच्याकडून उघड झालेल्या माहितीनुसार, नागपुरातील मोहम्मद आमिर मुलानी याच्या घरी मंगळवारी पोलिसांनी छापा घातला. तेथे सोने व्यापाऱ्याकडे असणारा डिजिटल तराजू आढळला. एमडी पुडीचे वजन मोजण्यासाठी आरोपी त्याचा वापर करीत होते. पोलिसांनी तो तराजू जप्त केला.

---

बेरोजगार तरुणांना गुंतवले

आमिर मुलानी याने नागपुरातील अनेक बेरोजगार तरुणांना एमडीच्या व्यसनाला लावून नंतर त्यांना तस्करीत ओढल्याची माहिती उघड झाली आहे. आमिर मुलानीसाठी मुंबईतून आमिर खान शाहरुख आणि पक्याच्या माध्यमातून नियमित लाखोची एमडी पाठवतो. मुलानीने ती उचलून ग्राहकांपर्यंत पोहोचविण्यासाठी कमिशनवर बेरोजगार तरुणांना ठेवले आहे.

---

जेलसे छुटा और...

यापूर्वीच्या एमडी तस्करीत मुंबईच्या आमिर खानला नागपूर पोलिसांनी अटक केली होती. तो तब्बल दीड वर्ष नागपूरच्या मध्यवर्ती कारागृहात बंदिस्त होता. लॉकडाऊन दरम्यान तो जामिनावर बाहेर आला आणि त्याने पुन्हा नशेचा कारभार सुरू केला.

सुशांतसिंग राजपूत प्रकरणानंतर एनसीबीने रिया चक्रवर्ती, दीपिका पदुकोणसह बॉलिवूडमधील नायक- नायिकांची चौकशी करून खळबळ उडवून दिली. त्यामुळे नशेचा बाजार काही काळ थंड झाला होता. आता तो पुन्हा गरम झाल्याचे ताज्या कारवाईतून स्पष्ट झाले आहे

---

सिनेमातील माफियाचा टच

शनिवारी मुंबईच्या आमिरकडून नागपूरच्या आमिरने बोलाविलेली २५६ ग्राम एमडी पोलिसांनी जप्त केल्यानंतरही आमिर मुलानी सिनेमातील ड्रग माफियासारखा तटस्थ राहिला. त्याने आवेशला आपली माणसे आणि एमडी पोलिसांनी पकडली. त्यामुळे तू नवीन आलेली खेप उचल, असे सांगून रविवारी १३५ ग्राम एमडी उचलण्याचा प्रयत्न केला. परंतु सतर्क असलेल्या पोलिसांनी आवेशलाही पकडले. त्याच रात्री आमिर मुलानी जरीपटक्यात दडून असल्याची माहिती कळल्यामुळे पोलिसांचे पथक त्याच्याकडे धावले. पोलिसांचे वाहन मागे लागल्याची कल्पना येताच सिनेमातील खलनायकाप्रमाणे रस्त्यावरच्या अनेक वाहनांना धडक देत आरोपी आमिर मुलानी पळून गेला. त्याने केलेल्या अपघाताची जरीपटका पोलीस ठाण्यात नोंद आहे, हे विशेष!

---

Web Title: Mumbai's Aamir smuggles MD with the help of Shah Rukh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.