मुंबईतील एमडी तस्कराला नागपुरात अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 22, 2019 11:28 PM2019-08-22T23:28:50+5:302019-08-22T23:29:37+5:30
अमली पदार्थाची तस्करी करणाऱ्या मुंबईतील एका तस्कराला अटक करून गुन्हे शाखेच्या पोलिसांनी त्याच्याकडून ५३ ग्रॅम एमडी पावडर जप्त केली.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : अमली पदार्थाचीतस्करी करणाऱ्या मुंबईतील एका तस्कराला अटक करून गुन्हे शाखेच्या पोलिसांनी त्याच्याकडून ५३ ग्रॅम एमडी पावडर जप्त केली. बाजारात त्याची किंमत १ लाख, ५९ हजार रुपये आहे. सुशांत प्रभाकर तांबे (वय २८) असे अटक करण्यात आलेल्या तस्कराचे नाव आहे.
सुशांत तांबे मुंबईतील देवनार परिसरात म्युन्सिपल कामगार वसाहतीत राहतो. तो नागपूर (कामठी) परिसरात एमडीची खेप घेऊन येत असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या (एनडीपीएस) सेलला मिळाली. त्यावरून सापळा रचण्यात आला. बुधवारी रात्री ११. ३० वाजता सुशांत तांबे कामठी रेल्वेस्थानक, सराय झोपडपट्टीसमोर सिमेंट रोडवर येताच एनडीपीएसचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र निकम, सहायक निरीक्षक विजय कसोधन, उपनिरीक्षक विठोबा काळे, अर्जुनसिंग ठाकूर, दत्ता बागुल, तुलसीदास शुक्ला, प्रदीप पवार, नायक सतीश पाटील, नितीन मिश्रा, नितीन साळुंखे, रुबिना शेख यांनी त्याच्या मुसक्या बांधल्या. त्याच्याकडून ५३ ग्रॅम एमडी आणि मोबाईल असा एकूण १ लाख, ७४ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.