मुंढे...कायद्याने वागा, पण लोकप्रतिनिधींचा अपमान करू नका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 27, 2020 09:27 PM2020-06-27T21:27:15+5:302020-06-27T21:28:34+5:30
मी नागपूरचा खासदार असतानाही स्मार्ट सिटी प्रकल्पाच्या कामात बदल करताना मलाही विश्वासात घेतले नाही. हे वागणे योग्य नाही, अशा शब्दात केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक, परिवहन व एमएसएमई मंत्री नितीन गडकरी यांनी मुंढे यांच्या कार्यशैलीवर नाराजी व्यक्त केली आहे. कायद्याने वागा, पण लोकप्रतिनिधींचा अपमान करू नका, असा सल्लाही त्यांनी मुंढे यांना दिला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : लोकशाहीत प्रशासनासोबतच लोकप्रतिनिधींनाही तितकेच महत्त्व आहे. प्रशासनाने लोकहिताची कामे करताना लोकप्रतिनिधींना विश्वासात घेतलेच पाहिजे. मात्र, महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे हे लोकप्रतिनिधींचा अपमान करतात. पालकमंत्र्यांचेही ऐकत नाहीत. मी नागपूरचा खासदार असतानाही स्मार्ट सिटी प्रकल्पाच्या कामात बदल करताना मलाही विश्वासात घेतले नाही. हे वागणे योग्य नाही, अशा शब्दात केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक, परिवहन व एमएसएमई मंत्री नितीन गडकरी यांनी मुंढे यांच्या कार्यशैलीवर नाराजी व्यक्त केली आहे. कायद्याने वागा, पण लोकप्रतिनिधींचा अपमान करू नका, असा सल्लाही त्यांनी मुंढे यांना दिला आहे.
गेली पाच दिवस महापालिकेच्या सभागृहात सर्वपक्षीय नगरसेवकांनी मुंढे यांच्या कार्यशैलीवर नाराजी व्यक्त केली. या पार्श्वभूभीवर ‘लोकमत’शी बोलताना गडकरी म्हणाले, मुंढे जर जनहितार्थ कठोर निर्णय घेत असतील, ते कायद्यानुसार योग्य असतील तर त्याला आमचा पाठिंबा आहे. मात्र, लोकप्रतिनिधींना विश्वासात न घेता एकतर्फी कारभार करणे योग्य नाही. महापौर, उपमहापौर, स्थायी समिती सभापती, नगरसेवक हे व्यक्तिगत नाही तर जनतेचे प्रतिनिधी आहेत. मनपा आयुक्त तुकाराम मुंढे येथे रुजू झाल्यानंतर १५ दिवस महापौरांना भेटले नाहीत. महापौरांचा अपमान करणे म्हणजे या शहरातील जनतेचा अपमान करण्यासारखे आहे. नगरसेवकांना भेटत नाहीत. काँग्रेस पक्षाच्या नगरसेवकांना तीन-तीन तास बाहेर बसवून ठेवतात. आमदारांशी चांगले वागत नाहीत. त्यामुळे त्यांच्याबद्दल लोकांच्या खूप तक्रारी आहेत.
मी नागपूरचा खासदार आहे. स्मार्ट सिटीचा प्रकल्प मी स्वत: आणला. केंद्र सरकारचे पैसे आहेत. त्या प्रकल्पात मनाला वाटेल तसा बदल करताना या शहराचा खासदार म्हणून मुंढे हे माझ्याशी एकही वेळा बोलले नाहीत. ते नगरसेवक, आमदार, खासदार कुणालाही विचारत नाहीत. इतकेच काय तर पालकमंत्री नितीन राऊत यांच्या बैठकीलाही ते उपस्थित नव्हते. असे काही चालत नाही. शेवटी लोकशाहीमध्ये प्रशासन व लोकप्रतिनिधीही महत्त्वाचे आहेत. लोकप्रतिनिधींना अशी अपमानजनक वागणूक देणे चांगले नाही. जे घडतंय ते दु:खद आहे. या सर्व गोष्टींकडे माझे बारकाईने लक्ष आहे, असा सूचक इशाराही गडकरी यांनी दिला आहे.
स्मार्ट सिटी प्रकल्पात मलाही विश्वासात घेतले नाही
मी शहराचा खासदार असताना कुठल्याही मोठ्या प्रकल्पाबाबतचे निर्णय घेताना मला साधी विचारणाही झाली नाही. स्मार्ट सिटीचा प्रकल्प नागपूरमधील महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे. रामनाथ सोनवणेसारखे चांगले अधिकारी मुंढे यांना कंटाळून हा प्रकल्प सोडून गेले. मुंढे यांनी बँकेमध्ये जाऊन अकाऊंटचे नाव बदलवून पैसे काढून टाकले. हे सगळं करताना त्यांनी परवानगी घ्यायला पाहिजे होती. खासदार म्हणून माझ्याशी चर्चा करायला हवी होती. अधिकारी असले तरी लोकशाहीमध्ये असा कारभार चालत नाही. समन्वयाने काम केले पाहिजे. याची गंभीर दखल आपण घेतल्याचे गडकरी यांनी सांगितले.