मुंढे येण्यापूर्वीच कर्मचाऱ्यांनी घेतला शिस्तीचा धसका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 23, 2020 01:01 AM2020-01-23T01:01:48+5:302020-01-23T01:03:04+5:30
शिस्तप्रिय, कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून ओळखले जाणारे प्रशासकीय अधिकारी तुकाराम मुंढेनागपूर महापालिकेच्या आयुक्तपदी रुजू होण्यापूर्वीच महापालिकेतील कामचुकार कर्मचारी व अधिकाऱ्यांनी त्यांची शिस्त व कर्तव्यदक्षतेचा धसका घेतल्याचे चित्र बुधवारी महापालिका मुख्यालयात बघायला मिळाले.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : शिस्तप्रिय, कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून ओळखले जाणारे प्रशासकीय अधिकारी तुकाराम मुंढे यांची नागपूर महापालिकेच्या आयुक्तपदी बदली करण्यात आली आहे. त्यांच्या नियुक्तीचे सत्तापक्ष व विरोधकांनी स्वागत केले आहे. तर रुजू होण्यापूर्वीच महापालिकेतील कामचुकार कर्मचारी व अधिकाऱ्यांनी त्यांची शिस्त व कर्तव्यदक्षतेचा धसका घेतल्याचे चित्र बुधवारी महापालिका मुख्यालयात बघायला मिळाले.
वास्तविक राज्यातील सत्ताबदलापासूनच मुंढे महापालिका आयुक्त म्हणून येणार असल्याची चर्चा होती. अखेर मंगळवारी त्यांची महापालिका आयुक्तपदी बदली करण्यात आली. मुंढे यांनी नाशिक व नवी मुंबई महापालिका आयुक्तपदाची जबाबदारी सांभाळली आहे. त्यांनी शहरातील अतिक्रमण व अनधिकृत बांधकामांच्या विरोधात बडगा उगारला होता. नागपूर जिल्हा परिषेदत मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून कार्यरत असताना त्यांनी उशिरा येणाऱ्या कर्मचाºयांना वठणीवर आणले होते. मुंढे यांच्या नियुक्तीमुळे आता पदाधिकारी व प्रशासनातील अधिकाऱ्यांवर खऱ्या अर्थाने वचक राहील आणि जनतेची कामे होतील, असे विरोधी पक्षातील काही नगरसेवकांनी सांगितले. शहरातील फूटपाथ अतिक्रमणमुक्त करण्याची मोहीम हाती घेतली आहे. परंतु या मोहिमेला अपेक्षित प्रतिसाद मिळत नसल्याचे चित्र आहे. अतिक्रमण हटविल्यानंतर पुन्हा दुसऱ्या दिवशी त्याच ठिकाणी अतिक्रमण कायम असते. नियमबाह्य, अनधिकृत बांधकामांना अभय देण्याच्या मुद्यावरून त्यांचा नेहमीच राजकारण्यांबरोबर संघर्ष झाला आहे. राजकारण्यांच्या दबावापुढे न झुकता नियमानुसार काम करणे ही तुकाराम मुंढे यांची खासियत आहे. त्यामुळेच शहरातील अतिक्रमण व अनधिकृत बांधकामांना आळा बसेल अशी आशा आहे.
प्रशासन व पदाधिकाऱ्यांत समन्वय राहील
महाराष्ट्र शासनाने महापालिकेच्या आयुक्तपदी तुकाराम मुंढे यांची नियुक्ती केली. शासनाच्या या निर्णयाचे मी स्वागत करतो. ते शिस्तप्रिय असल्याने मनपा प्रशासनालाही शिस्त लागेल. प्रशासन व पदाधिकारी यांच्यात समन्वय राहील, असा विश्वास माजी महापौर प्रवीण दटके यांनी व्यक्त केला. मुंढे यांच्या नेतृत्वात प्रशासन अधिक जोमाने काम करेल, कर वसुलीच्या माध्यमातून अधिक महसूल मनपा तिजोरीत जमा होईल. शहरातील अतिक्रमणाला आळा बसेल, असा विश्वास दटके यांनी व्यक्त केला.