मुंढे यांचा वित्त विभागातील चौघांना दणका!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 29, 2020 10:31 PM2020-01-29T22:31:31+5:302020-01-29T22:34:29+5:30

बुधवारी महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी लेखा व वित्त विभागाला आकस्मिक भेट देऊन कामकाजाची माहिती घेतली. यात अनियमितता निदर्शनास आल्याने चार कर्मचाऱ्यांना कारणे द्या नोटीस बजावण्याचे निर्देश प्रशासनाला दिले.

Mundhe hit four officials in the finance department! | मुंढे यांचा वित्त विभागातील चौघांना दणका!

मुंढे यांचा वित्त विभागातील चौघांना दणका!

Next
ठळक मुद्देनोटीस बजावण्याचे निर्देश : जीपीएफ व पेन्शन योजनेत अनियमितता

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी आयुक्तपदाचा पदभार स्वीकारल्यानंतर बैठकीत अधिकारी व कर्मचाऱ्यांना नियमानुसार कामे करा, कामाप्रति प्रामाणिक असणाऱ्यांना कुठल्याही प्रकारची भीती बाळगण्याचे कारण नाही. पण अनियमितता खपवून घेणार नसल्याचा इशारा दिला होता. याचा प्रत्यय महापालिकेच्या लेखा व वित्त विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना आला. बुधवारी मुंढे यांनी या विभागाला आकस्मिक भेट देऊ न कामकाजाची माहिती घेतली. यात अनियमितता निदर्शनास आल्याने चार कर्मचाऱ्यांना कारणे द्या नोटीस बजावण्याचे निर्देश प्रशासनाला दिले.
वित्त विभागातील लेखा अधिकारी प्रतिभा श्रेया, जीपीएफ विभागातील पौर्णिमा पाठक, अंशदायी पेन्शन योजना विभागातील नरेश बोकडे व वहीद शेख आदींना कारणे द्या, नोटीस बजावण्याचे निर्देश देण्यात आले आहे. कामकाजात अनियमितता निदर्शनास आल्याने ही कारवाई करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली.
लेखा अधिकारी, निगम लेखा परीक्षक, सेवा निवृत्ती शाखा, भविष्य निर्वाह निधी शाखा, नियंत्रण द्वि नोंद लेखांक पद्धती अशी पदे मंजूर आहेत. या विभागातील पदावर अन्य विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. यात पात्रता नसतानाही काही जणांवर जबाबदारी देण्यात आली आहे. या विभागातील डी.डी. डहाके यांची अकारण समिती विभागात बदली करण्यात आली आहे. तर रवींद्र भारती यांच्याकडे सोयीनुसार सहायक अधीक्षक पदाचा पदभार देण्यात आल्याची माहिती आहे. कर्मचाऱ्यांची भविष्य निर्वाह निधीची प्रकरणे, जीपीएफ पावत्यांचा घोळ, सिटीझन चार्टरमधील अनियमितता यामुळे मुंढे यांनी नोटीस बजावण्याचे निर्देश दिल्याची माहिती आहे. बुधवारी दुपारी ३ च्या सुमारास आयुक्तांनी लेखा व वित्त विभागाला भेट दिली. लेखा व वित्त अधिकारी अनंता मडावी यांनी यांच्याकडून माहिती जाणून घेतली.

बैठकीला जाण्याची परवानगी घ्या
अधिकाऱ्यांनी बैठकीला जाण्यापूर्वी आयुक्त कार्यालयाला सूचित करून परवानगी निर्देश देण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली. त्यामुळे महापालिकेत लहानसहान कामासाठी आयोजित होणाऱ्या बैठकांना आळा बसणार आहे. परंतु आयुक्तांच्या आदेशाचे पालन न केल्यास काही पदाधिकारी नाराज होतील, अशी भीती असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.

Web Title: Mundhe hit four officials in the finance department!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.