मुंढे साहेब, ‘व्हॉट इज युवर प्रॉब्लेम’?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2020 08:07 PM2020-06-16T20:07:14+5:302020-06-16T20:09:06+5:30
आयुक्त स्थायी समितीच्या बैठकीला आधी परवानगी नाकारतात, नंतर तेच परवानगी देतात. निगम सचिवांनी आयुक्तांशी चर्चा केल्यानतंरच २०जूनच्या सर्वसाधारण सभेचा अजेंडा काढला. त्यानंतर सोमवारी प्रशासनाकडून महापौर कार्यालयाला पत्र पाठवून कोरोना संसर्गाचा विचार करता ही सभा घेणे योग्य होणार नाही, असे सांगितले जाते. शासनाच्या दिशानिर्देशानुसार आयोजित सभेलाही विरोध केला जातोय, आयुक्त मुंढे साहेब, ‘व्हॉट इज युवर प्राब्लेम’अशा शब्दात महापौर संदीप जोशी यांनी आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या भूमिकेबाबत मंगळवारी पत्रकार परिषदेत नाराजी व्यक्त केली.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर :आयुक्त स्थायी समितीच्या बैठकीला आधी परवानगी नाकारतात, नंतर तेच परवानगी देतात. निगम सचिवांनी आयुक्तांशी चर्चा केल्यानतंरच २०जूनच्या सर्वसाधारण सभेचा अजेंडा काढला. त्यानंतर सोमवारी प्रशासनाकडून महापौर कार्यालयाला पत्र पाठवून कोरोना संसर्गाचा विचार करता ही सभा घेणे योग्य होणार नाही, असे सांगितले जाते. शासनाच्या दिशानिर्देशानुसार आयोजित सभेलाही विरोध केला जातोय, आयुक्त मुंढे साहेब, ‘व्हॉट इज युवर प्राब्लेम’अशा शब्दात महापौर संदीप जोशी यांनी आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या भूमिकेबाबत मंगळवारी पत्रकार परिषदेत नाराजी व्यक्त केली.
पदाधिकारी व प्रशासन ही दोन चाके आहेत. समन्वयाशिवाय शहराचा विकास शक्य नाही. विकासाचा विचार करता शक्यतो आम्ही संघर्षाची भूमिका टाळत आहोत. पण पूर्वग्रहदूषित ठेवून आयुक्त आलेत. महापालिकेत सभागृह हे सर्वोच्च असून स्थायी समिती, महापौर, स्थायी समिती अध्यक्ष व आयुक्त असा प्रोटोकॉल आहे. पण स्थायी समिती अध्यक्षांच्या ओएसडीची बदली करताना पदधिकाऱ्यांना साधी कल्पनाही नाही. यापूर्वी मनपात असे कधी घडले नाही. कुठल्याही महापालिकेत प्रशासनाने घेतलेल्या निर्णयाची माहिती माहिती महापौरांना दिली जाते. पण मुंढे साहेब कोणत्याही पदाधिकाऱ्यांना काहीच सांगत नसल्याचा आरोप संदीप जोशी यांनी केला.
स्थायी समितीची ५ मे रोजी बैठक झाली. १५ मे रोजी होणारी बैठक घेऊ नका, असे आदेश आयुक्तांनी दिले. त्यानंतर १ जूनला पत्र दिले, बैठक घ्या. वास्तविक शासनाच्या ३ जूनच्या परिपत्रकात सभा, बैठका घेण्याला कुठलेही निर्बंध घातलेले नाहीत. २० जूनला सुरेश भट सभागृहात होणारी सभा फिजिकल डिस्टन्स ठेवूनच घेतली जाणार आहे. असे असूनही आयुक्तांनी सभा न घेण्याचा सल्ला दिला असल्याचे जोशी म्हणाले.
२० जूनची सभा होणारच
शासनाच्या दिशानिर्देशांचे पालन करूनच २० जूनला महापालिकेची सर्वसाधारण सभा घेतली जाणार आहे. गंभीर स्थिती असूनही पुणे महापालिकेची १७ जूनला सभा होत आहे. नाशिक व पिंपरी चिंचवड महापालिकांच्या सभा झाल्या आहेत. सभागृह घेण्याचा महापौरांचा अधिकार आहे. नागरिकांचे हित लक्षात घेता सभा होणार असल्याचे जोशी यांनी सांगितले. सभेला परवानगी नाकारलीच तर सर्वपक्षीय गटनेत्यांच्या बैठकीत पुढील निर्णय घेऊ, असेही ते म्हणाले.
नगरसेवक हवालदिल
दोन दिवसाच्या पावसात शहराच्या अनेक भागात पाणी तुंबले. पाणी घरात शिरल्याने नागरिक नगरसेवकांना जाब विचारतात. नाल्या, चेंबर दुरुस्तीच्या लाख-दोन लाखांच्या फाईल प्रलंबित आहेत. अत्यावश्यक कामांसाठी निधी दिला जात नाही, असे जोशी यांनी सांगितले.
३०० लोकांना मार्गदर्शन कसे केले?
आयुक्त म्हणतात, मी कायद्यानुसार काम करतो. मनपाच्या बैठका, सभा घेऊ नका असा सल्ला देतात. मात्र आयुक्तांनी स्वत: ३१ मे रोजी रजवाडा पॅलेस येथे ३०० लोकांना मार्गदर्शन कसे केले? स्वत: नियम पाळत नाहीत. दुसऱ्यांना नियम सांगतात, असा आरोप जोशी यांनी केला.