आपत्ती व्यवस्थापनासाठी मनपा अ‍ॅक्शन मोडवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 6, 2021 04:06 AM2021-06-06T04:06:41+5:302021-06-06T04:06:41+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : हवामान खात्याने यंदा उत्तम पावसाचा अंदाज वर्तविल्याने अतिवृष्टीची शक्यता लक्षात घेता, महापालिका प्रशासन अ‍ॅक्शन ...

On Municipal Action Mode for Disaster Management | आपत्ती व्यवस्थापनासाठी मनपा अ‍ॅक्शन मोडवर

आपत्ती व्यवस्थापनासाठी मनपा अ‍ॅक्शन मोडवर

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : हवामान खात्याने यंदा उत्तम पावसाचा अंदाज वर्तविल्याने अतिवृष्टीची शक्यता लक्षात घेता, महापालिका प्रशासन अ‍ॅक्शन मोडवर आले आहे. आपत्ती व्यवस्थापनाच्या दृष्टीने अधिकाऱ्यांना विविध जबाबदाऱ्यांचे वाटप करण्यात आले आहे. मनपा केंद्रीय कार्यालयातील अग्निशमन विभागात एक नियंत्रण कक्ष कार्यान्वित करण्यात आला असून, तो २४ तास सुरू राहणार आहे.

यासंदर्भात मनपाच्या सामान्य प्रशासन विभागाने आदेश जारी केला आहे. अतिवृष्टीमुळे शिकस्त घरे पडणे, रस्त्यावरील झाडे कोसळणे, वाहतुकीच्या मुख्य रस्त्यावर तसेच अंतर्गत रस्त्यावर पाणी साचून राहणे, आदी बाबी प्रामुख्याने आढळून येतात. पावसामुळे जीवितहानी व वित्तहानी होणार नाही याकरिता या उपाययोजना आवश्यक असून याबाबत संपूर्ण नियोजन करण्यात आले आहे. यासाठी चार चमू कार्यरत राहतील.

याअंतर्गत संपूर्ण शहरस्तरावरील घटना प्रतिसाद प्रणालीचे इन्सिडंट कमांडर अतिरिक्त आयुक्त (शहर) आहेत. या प्रणालीचे नियोजन विभाग प्रमुख सार्वजनिक बांधकाम विभागाचे मुख्य अभियंता आहेत. त्यांच्या नियंत्रणात रिस्पॉन्स ब्रॅन्च हेड कार्यरत राहतील. १ जून ते ३० सप्टेंबर या कालावधीसाठी प्रत्येक दिवसासाठी एक-एक अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. याप्रमाणेच नियंत्रण कक्षामध्ये उपविभागीय अभियंता, अधिकारी नियंत्रण कक्षात कार्यरत कर्मचाऱ्यांवर नियंत्रण ठेवून नियंत्रण प्रमुखांशी समन्वय साधतील. अतिवृष्टी आल्यास नियंत्रण कक्षात व्यक्तिश: उपस्थित राहतील.

...

सहायक आयुक्तांना सज्ज राहण्याचे निर्देश

सर्व वॉर्ड अधिकारी आपत्कालीन परिस्थितीचा सामना करण्यासाठी आपल्यास्तरावर आवश्यक यंत्रणा सुसज्ज ठेवतील. रात्रपाळीत आरोग्य विभागाचा आरोग्य निरीक्षक, कनिष्ठ अभियंता, स्थापत्य अभियांत्रिकी सहायक उपस्थित राहतील, याप्रमाणे व्यवस्था करण्याचे निर्देश झोनल कार्यालयांना देण्यात आले आहेत. अतिवृष्टीमुळे खोलगट भागातील वस्त्यांमध्ये पाणी शिरल्यास तेथील रहिवाशांना स्थानांतरित करण्याच्या दृष्टीने मनपाच्या लगतच्या परिसरातील शाळा, समाजमंदिरे आदी बाबतची यादी संबंधित मुख्याध्यापक, व्यक्ती यांचे पूर्ण नाव, पत्ता, दूरध्वनी क्रमांक, चौकीदाराचे नाव आदी यंत्रणेसह सुसज्ज करण्यासंबंधीची जबाबदारी सहायक आयुक्तांना सोपविण्यात आली आहे.

...

२४ तास नियंत्रण कक्ष

शहरात होणाऱ्या नुकसानीची माहिती मिळण्यासाठी आणि नागरिकांना तात्काळ मदत मिळावी, यासाठी मनपाने अग्निशमन विभागात नियंत्रण कक्ष कार्यान्वित केला आहे. हा नियंत्रण कक्ष २४ तास कार्यान्वित राहील. नियंत्रण कक्षात अधिकारी व कर्मचारी यांची दोन-तीन पाळीत सेवा उपलब्ध करण्यात येत आहे. नियंत्रण कक्षाचा दूरध्वनी क्रमांक ०७१२-२५६७०२९, ०७१२-२५६७७७७ असा राहील. आपत्कालीन कक्ष, सिव्हिल मुख्यालय अग्निशमन केंद्र येथील दूरध्वनी क्र. ०७१२-२५४०२९९, ०७१२-२५४०१८८, १०१, १०८ आणि भ्रमणध्वनी क्रमांक ७०३०९७२२०० असा राहील.

Web Title: On Municipal Action Mode for Disaster Management

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.