निराधार मुलीला मनपा-चाईल्ड लाईनने दिला आधार!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2021 04:09 AM2021-06-16T04:09:04+5:302021-06-16T04:09:04+5:30

आरोग्य तपासणी करून वसतिगृहामध्ये केले दाखल लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : लहानपणीच आई-वडिलांचे छत्र हरपलेले. अशात एकमेव आधार असलेला ...

Municipal-Child Line gave support to a destitute girl! | निराधार मुलीला मनपा-चाईल्ड लाईनने दिला आधार!

निराधार मुलीला मनपा-चाईल्ड लाईनने दिला आधार!

Next

आरोग्य तपासणी करून वसतिगृहामध्ये केले दाखल

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : लहानपणीच आई-वडिलांचे छत्र हरपलेले. अशात एकमेव आधार असलेला भाऊ क्षयरुग्ण, बहीण-भावाला दुसरा आधार नसल्याने रस्त्याच्या कडेला हातठेल्यावर रात्र काढायची, मिळेल ते खायचे आणि जीवन व्यतीत करायचे. मनपाच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर रुग्णालयामध्ये एमडीआरटीबीचे उपचार घेण्यासाठी आलेल्या भावाकडून ही माहिती कळताच डॉक्टर अचंचबित झाले. यावर सर्वांनी सकारात्मक पाऊल उचलत ‘त्या’ निराधार मुलीला आधार देत तिला वसतिगृहामध्ये दाखल केले.

उपल्लवाडी मार्गावरील समता नगर परिसरात राहणाऱ्या बहीण-भावाची ही करुण कहाणी. चाईल्ड लाईन या स्वयंसेवी संस्थेच्या मदतीने मुलीला सध्या आशाकिरण बाल वसतिगृह येथे प्रवेश देण्यात आलेला आहे. या भावंडांचे वडिलांचे छत्र हरविले तेव्हा त्यांना समजही नव्हती. त्यात एकमेव आधार असलेल्या आईचे २०१८ मध्ये क्षयरोग व एचआयव्हीमुळे निधन झाले. भावावर लहान बहिणीची जबाबदारी आली. २०१८ पासून दोन्ही भावंडं तटपुंज्या कपड्यांसह मिळेल ते खाऊन एका हातठेल्यावर झोपून दिवस काढत होते. भाऊ एमडीआरटीबीचा रुग्ण असल्याने तो मनपाच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर रुग्णालयामध्ये उपचारासाठी आला. त्यावेळी त्याचे समुपदेशन करताना डॉक्टरांपुढे हे वास्तव पुढे आले.

एकूणच परिस्थिती लक्षात घेता डॉ. रोशनी, एसटीएस शिवानंद जायभाये आणि शैलेंद्र मेश्राम यांनी चाईल्ड लाईनशी संपर्क साधला. त्यांना संपूर्ण परिस्थितीशी अवगत केल्यानंतर मुलीला नवीन कपडे घेऊन दिले, तिची कोरोना चाचणी व आरोग्य तपासणी करून मुलीला आशाकिरण वसतिगृहामध्ये दाखल करण्यात आले. या संपूर्ण कार्यामध्ये चाईल्ड लाईनची टीम व सक्षम कार्यक्रम अधिकारी कोमेश नीलिमा यांचे सहकार्य लाभले.

Web Title: Municipal-Child Line gave support to a destitute girl!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.