मनपा आयुक्त उच्च शिक्षणासाठी वर्षभराच्या रजेवर
By मंगेश व्यवहारे | Published: July 1, 2023 04:52 PM2023-07-01T16:52:18+5:302023-07-01T16:55:52+5:30
मध्यंतरी त्यांची मंत्रालयात सचिवपदी बदली होणार असल्याची चर्चा होती. आता ते विदेशात उच्च शिक्षणासाठी जात आहेत.
नागपूर : महापालिकेचे आयुक्त व प्रशासक राधाकृष्णन बी. हे उच्च शिक्षणासाठी विदेशात जाणार आहे. त्यासाठी शासनाने त्यांना १ वर्षाची सुट्टी मंजूर केली आहे. ३० जून त्यांचा महापालिकेतील अखेरचा दिवस होता. वर्षभरासाठी रजेवर गेल्यामुळे मनपाच्या अधिकाऱ्यांनी त्यांचा निरोप समारंभ आटोपून निरोपही दिला. त्यांच्या जागेवर आता नवीन आयुक्त कोण येणार याविषयी मनपा अधिकारी व कर्मचाऱ्यामध्ये उत्सुकता आहे.
आयुक्त राधाकृष्णन बी. हे पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशनमध्ये पदविका घेण्यासाठी हारवर्ड युनिव्हर्सिटी बोस्टन येथे जाणार आहे. त्यासाठी शासनाने त्यांना ५ जुलै २०२३ ते ३१ मे २०२४ या कालावधीकरीता रजा मंजूर केली आहे. राधाकृष्णन बी. यांना महापालिकेत आयुक्त म्हणून तीन वर्ष पूर्ण झाली आहेत. शासनाच्या नियमानुसार एका ठिकाणी तीन वर्ष पूर्ण झालेल्या अधिकाऱ्यांची बदली होत असते. राधाकृष्णन बी. हे सुद्धा बदलीस पात्र होते. मध्यंतरी त्यांची मंत्रालयात सचिवपदी बदली होणार असल्याची चर्चा होती. आता ते विदेशात उच्च शिक्षणासाठी जात आहेत. त्यासाठी त्यांनी राज्य शासनाकडे एक वर्षाची रजा मंजूर करण्याविषयी विनंती केली होती. त्यानुसार शासनाने त्यांची रजा मंजूर केली आहे.
- जिल्हाधिकाऱ्यांना सोपविला कारभार
महापालिकेत तीन अतिरिक्त आयुक्तांपैकी दोन पदे रिक्त आहे. मनपा आयुक्त रजेवर जात असल्याने त्यांचा कार्यभार जिल्हाधिकारी डॉ. विपिन इटनकर यांना सोपविण्याचे निर्देश सामान्य प्रशासनाने दिले आहे.