स्मार्ट सिटी बनविणार महापालिकेच्या तीन `मॉडल शाळा‘
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 14, 2021 12:09 PM2021-07-14T12:09:19+5:302021-07-14T12:09:45+5:30
Nagpur News नागपूर स्मार्ट एड सस्टेनेबल सिटी डेव्हलपमेंट कार्पोरेशन लिमिटेड (एनएसएससीडीसीएल) पूर्व नागपूर भागातील पारडी, पुनापुर, भरतवाडा, भांडेवाडी भागातील महापालिकेच्या तीन शाळा `मॉडल शाळा‘ स्वरुपात विकसित करणार आहे .
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : नागपूर स्मार्ट एड सस्टेनेबल सिटी डेव्हलपमेंट कार्पोरेशन लिमिटेड (एनएसएससीडीसीएल) पूर्व नागपूर भागातील पारडी, पुनापुर, भरतवाडा, भांडेवाडी भागातील महापालिकेच्या तीन शाळा `मॉडल शाळा‘ स्वरुपात विकसित करणार आहे .
स्मार्ट सिटीच्या शिक्षित आणि निरामय पीबीपी उपक्रमांतर्गत मनपाच्या संत कबीर हिंदी प्रायमरी शाळा, महाराणी लक्ष्मीबाई मराठी उच्च प्राथमिक शाळा आणि भरतवाडा मराठी उच्च प्राथमिक शाळेचा विकास करण्याचा निर्णय घेतल्याची माहिती स्मार्ट सिटीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी भुवनेश्वरी एस. यांनी दिली.
नागपूर स्मार्ट सिटीच्या माध्यमाने या शाळांना सर्व सुविधा पुरविण्यात येतील. विद्यार्थ्यांसाठी पिण्याच्या पाण्यासाठी आर.ओ.ची सुविधा, रेन वॉटर हार्वेर्स्टींग, सोलर रुफ टॉप आणि वेगवेगळ्या सुविधा स्मार्ट पध्दतीने देण्यात येतील. मुलांसाठी, मुलींसाठी व शिक्षकांसाठी स्वतंत्र शौचालये तयार करण्यात येतील. शाळांच्या इमारतीचे नूतनीकरण, फ्लोरिंग, वॉटर प्रूफींग करुन शाळेच्या इमारतीला शिक्षणायोग्य करण्यात येईल. विद्यार्थ्यांसाठी ई-लायब्ररीची सुविधा तसेच त्यांना टॅब आणि कॉम्प्युटरची सुविधा दिली जाईल. विद्यार्थ्यांच्या सायकली ठेवण्यासाठी पार्किंग शेड, खेळण्यायोग्य मैदान, इमारतीची रंगरंगोटी करण्यात येईल. यावर २ कोटी खर्च करण्यात येतील.
१० कोटीची तरतूद
स्मार्ट सिटीतर्फे शिक्षित आणि निरामय पी.बी.पी. उपक्रमासाठी १० कोटीची तरतूद केली आहे. यातील २ कोटीचा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. स्मार्ट सिटी आणि मनपाच्या शिक्षण विभागाच्या सहकार्याने ही कामे पूर्ण केली जाईल. देखभाल दुरुस्ती मनपाचा शिक्षण विभाग करणार आहे.