तीन वर्षानंतरही दुकाने खाली करण्यास मनपा अपयशी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 4, 2021 04:11 AM2021-09-04T04:11:49+5:302021-09-04T04:11:49+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : जयस्तंभ चौक ते मानस चौकदरम्यान राष्ट्रीय रस्ते निधी(सीआरएफ)मधून सहा पदरी रस्ता बनविण्याची योजना तीन ...

Municipal Corporation fails to take down shops even after three years | तीन वर्षानंतरही दुकाने खाली करण्यास मनपा अपयशी

तीन वर्षानंतरही दुकाने खाली करण्यास मनपा अपयशी

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : जयस्तंभ चौक ते मानस चौकदरम्यान राष्ट्रीय रस्ते निधी(सीआरएफ)मधून सहा पदरी रस्ता बनविण्याची योजना तीन वर्षांपूर्वी मंजूर झाली. परंतु आतापर्यंत गणेश टेकडी उड्डाणपुलाखालील दुकाने मनपा खाली करू शकलेली नाही. रेल्वेस्टेशनजवळ बनविण्यात येत असलेल्या प्लाझामध्ये २०० दुकाने प्रस्तावित आहेत. परंतु तिथे जाण्यासही दुकानदार तयार नाहीत. सुनावणी पूर्ण झाल्यानंतरही सहमती होऊ शकली नाही. त्यामुळे मनपाने नुकसान भरपाई देण्याचा नवीन फाॅर्म्युला तयार केला आहे. या फाॅर्म्युल्याला येणाऱ्या सर्वसाधारण सभेत मंजुरी मिळण्याची शक्यता आहे.

मनपाने २००८ मध्ये मानस चौक ते जयस्तंभ चौकदरम्यान ८१२ मीटर लांब आणि १०.५ मीटर रुंद उड्डाणपूल तयार केला होता. उड्डाणपुलाखाली १७५ दुकाने व शौचालय बनविण्यात आले होते. या उड्डाणपुलावर १६.२३ कोटी रुपये खर्च आला होता. १७५ पैकी १६० दुकानदारांनीच ताबा घेतला होता. दरम्यान, भविष्यातील वाहतूक व्यवस्था लक्षात घेऊन उड्डाणपूल पाडून सहा पदरी रस्ता बनविण्याच्या योजनेला २०१८ मध्ये मंजुरी देण्यात आली. यासोबतच या मार्गाला जोडून जयस्तंभ चौक ते श्रीमोहिनी कॉम्प्लेक्स वाय शेपमध्ये जोडमार्ग व उड्डाणपूल तयार करण्यात येणार आहे. संबंधित उड्डाणपुलाचे कााम सुरू झाले आहे. तर सहा पदरी रस्त्याचे काम दुकानदारांनी दुकाने खाली न केल्यामुळे अडकून पडले आहे. सीआरएफअंतर्गत १९ जुलै २०१८ रोजी २३४.२१ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. महामेट्रोला कामाची जबाबदारी देण्यात आली आहे.

-बॉक्स

-दुकानदारांची सुनावणी पूर्ण झाली

- मनपातर्फे १६० दुकानदारांपैकी १२९ दुकानदारांना नोटीस देण्यात आली. सुनावणीत सर्व दुकानदार उपस्थित होते. ४७ दुकानदारांनी चक्रवाढ व्याजदर किंवा आजच्या बाजारभावानुसार भरपाई देण्याची मागणी केली.

- ३० दुकानदारांनी पर्यायी जागा घेण्याची इच्छा व्यक्त केेली. परंतु महामेट्रोने तयार करून दिलेल्या ७० तात्पुरत्या दुकानांची स्थिती पाहता, त्यांनी दुकान घेण्यास नकार दिला.

- एकूणच दुकानदारांना दुसऱ्या ठिकाणची दुकाने पसंत आलेली नाहीत. काही जण न्यायालयात जाण्याच्या तयारीत आहेत. त्यामुळे मनपा दुकानदारांनी जमा केलेली कोट्यवधी रुपयांची रक्कम व्याजासह परत करण्याच्या तयारीत आहे. मनपा सभागृहात याबाबतचा प्रस्ताव मंजुरीसाठी सादर केला जाईल.

बॉक्स

- मनपाचा फाॅर्म्युला

गणेश टेकडी उड्डाणपुलाखाली १६० दुकानदारांनी मनपाच्या तिजोरीत ११.९६ कोटी रुपये जमा केले. दुकानासह उड्डाणपूल बनविण्यावर १६.२३ कोटी रुपये खर्च झाले. दुकानदारांनी दुकानांचा १२ वर्षे वापर केला. या वापराची रक्कम सोडून जर ८.५० टक्के व्याजासह दुकानदारांना रक्कम परत केली गेली तर एकूण १९.८४ कोटी रुपये परत करावे लागतील. वर्ष २०२१-२२ च्या अर्थसंकल्पात या रकमेचे विनियोजन करावे लागेल.

Web Title: Municipal Corporation fails to take down shops even after three years

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.