मनपातर्फे सशस्त्र क्रांतिकारक प्रभाकर देशपांडे यांचा सत्कार()
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 8, 2020 04:09 AM2020-12-08T04:09:18+5:302020-12-08T04:09:18+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात सशस्त्र युद्धाचा सशक्त पर्याय निर्माण करणारे, अग्रणी स्वातंत्र्य सैनिक क्रांतिकारक राजा ...
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात सशस्त्र युद्धाचा सशक्त पर्याय निर्माण करणारे, अग्रणी स्वातंत्र्य सैनिक क्रांतिकारक राजा उपाख्य प्रभाकर लक्ष्मण देशपांडे यांनी नुकतेच वयाच्या शंभराव्या वर्षात पदार्पण केले आहे. यानिमित्ताने मनपातील पदाधिकाऱ्यांनी सोमवारी धंतोली परिसरातील त्यांच्या घरी जाऊन त्यांना शाल, पुष्पगुच्छ व सन्मानचिन्ह देऊन त्यांचा भावपूर्ण सत्कार केला. यात उपमहापौर मनीषा कोठे, आ. प्रवीण दटके, स्थायी समिती अध्यक्ष विजय (पिंटू) झलके, सत्तापक्ष नेते संदीप जाधव व ज्येष्ठ नगरसेवक दयाशंकर तिवारी, नगरसेवक लखन येरावार आदींचा समावेश हाेता.
यावेळी प्रभाकर देशपांडे यांचे चिरंजीव उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश अजित देशपांडे व परिवारातील अन्य सदस्य उपस्थित होते. प्रवीण दटके यांनी त्यांना छत्रपती शिवाजी महाराज यांची प्रतिमा देऊन अभिष्टचिंतन केले.
वयाचे १२ व्या वर्षी महान क्रांतिकारक भगतसिंह यांच्या प्रेरणेने राजा उपाख्य प्रभाकर लक्ष्मण देशपांडे यांनी १९४२ मध्ये सशस्त्र क्रांतीच्या कार्यात स्वत:ला वाहून घेतले होते. त्यांनी बॉम्ब बनविण्याचे प्रशिक्षण घेतले होते. नागपूरच्या इतिहासामध्ये तेलंगखेडी बॉम्ब खटला म्हणून ही घटना अधोरेखित आहे. यासाठी त्यांना दोन वर्षांचा तुरुंगवास झाला होता. विशेष म्हणजे त्यांचा जन्म धंतोली येथील याच घरात झाला आहे. त्यांचे एक चिरंजीव उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश आहेत, तर दुसरे अनिल हे माजी रणजीपटू आहेत. तिसरा मुलगा संजय हे व्यावसायिक आहेत. त्यांना स्वातंत्र्य युद्धातील सक्रिय सहभागासाठी भारत सरकारतर्फे ताम्रपट व प्रशस्तीपत्र देऊन गौरवान्वित करण्यात आले आहे. त्यांच्या पत्नी सुधा वयाच्या ९५ वर्षीही सक्रिय आहेत.