-तर मनपा ग्रीन बस आपल्या ताब्यात घेईल!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 22, 2018 09:06 PM2018-08-22T21:06:51+5:302018-08-22T21:08:15+5:30
स्वीडनच्या स्कॅनिया कंपनीने केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचा ‘ड्रीम प्रोजेक्ट’असलेली ग्रीन बससेवा गेल्या १० दिवसापासून बंद केली आहे. गडकरी यांनी महापालिका मुख्यालयात बैठक घेऊ न स्कॅनिया कंपनीच्या प्रतिनिधींना बससेवा पूर्ववत सुरू करण्यास सांगितले होते, सोबतच ग्रीन बसच्या समस्या मार्गी लावण्याचे आश्वासनही दिले होते. त्यानंतरही कंपनीच्या प्रतिनिधींनी बससेवा सुरू केलेली नाही. याचा विचार करता करारातील तरतुदीच्या आधारावर परिवहन समिती कठोर निर्णय घेण्याच्या विचारात आहे. आज गुरुवारी दिल्लीत होणाऱ्या बैठकीत ग्रीन बसवर तोडगा निघाला नाही तर महापालिका एमआयडीसी डेपोत उभ्या असलेल्या २८ ग्रीन बसेस आपल्या ताब्यात घेण्याच्या विचारात आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : स्वीडनच्या स्कॅनिया कंपनीने केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचा ‘ड्रीम प्रोजेक्ट’असलेली ग्रीन बससेवा गेल्या १० दिवसापासून बंद केली आहे. गडकरी यांनी महापालिका मुख्यालयात बैठक घेऊ न स्कॅनिया कंपनीच्या प्रतिनिधींना बससेवा पूर्ववत सुरू करण्यास सांगितले होते, सोबतच ग्रीन बसच्या समस्या मार्गी लावण्याचे आश्वासनही दिले होते. त्यानंतरही कंपनीच्या प्रतिनिधींनी बससेवा सुरू केलेली नाही. याचा विचार करता करारातील तरतुदीच्या आधारावर परिवहन समिती कठोर निर्णय घेण्याच्या विचारात आहे. आज गुरुवारी दिल्लीत होणाऱ्या बैठकीत ग्रीन बसवर तोडगा निघाला नाही तर महापालिका एमआयडीसी डेपोत उभ्या असलेल्या २८ ग्रीन बसेस आपल्या ताब्यात घेण्याच्या विचारात आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार, रेड बस आॅपरेटर असलेली पुणे येथील ट्रॅव्हल टाइम कंपनी ग्रीन बस चालविण्यास सक्षम आहे. महापालिकेने ग्रीन बस ताब्यात घेतल्यास ट्रॅव्हल टाइम कंपनी ही बससेवा चालवू शकते. करारातील शर्तीनुसार नागरिकांना आवश्यक सेवा उपलब्ध करण्याच्या कारणावरून ग्रीन बससेवा या कंपनीकडे सोपविण्यात कायद्याची अडचण येणार नाही.
आकारण्यात आलेला १८ टक्के जीएसटी, एस्क्रो खाते व सुसज्ज डेपोची सुविधा यासंदर्भात स्कॅनिया कंपनीने मागील काही महिन्यांत महापालिकेशी अनेकदा पत्रव्यवहार केला. परंतु महापालिका प्रशासनाने याची दखल घेतली नाही. त्यानंतर ६० दिवसांची नोटीस बजावून बससेवा बंद करण्याचा इशारा दिला होता. त्यानंतरही तोडगा न निघाल्याने नोटीसची मुदत संपताच १२ आॅगस्टला बसेस बंद केल्या. रविवारी १२ आॅगस्टलाच केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी महापालिका मुख्यालयात ग्रीन बसच्या मुद्यावर बैठक घेतली. तोडगा काढण्यासाठी सकारात्मक भूमिका घेतली. त्यानंतरही बससेवा सुरू केली नाही.
गडकरी यांच्या सांगण्यानुसार, दिल्ली येथील बैठकीसाठी महापौर नंदा जिचकार, परिवहन समितीचे सभापती बंटी कुकडे यांच्यासह महापालिकेतील वरिष्ठ अधिकारी दिल्लीला पोहोचले आहेत. या बैठकीत नागनदी प्रकल्प व एनएचआयतर्फे सुरू असलेल्या कामांचाही आढावा घेतला जाणार आहे.
वेळ पडल्यास कठोर निर्णय घेणार
ग्रीन बससेवा शहरातील प्रवाशांच्या दृष्टीने महत्त्वाची आहे. समस्यांवर तोडगा काढण्याचे आश्वासन दिल्यानंतरही स्कॅनिया कंपनीने ही सेवा बंद केली. महापालिका व स्कॅनिया कंपनी यांच्यात झालेल्या कराराचा विचार करता, महापालिका कठोर निर्णय घेण्याच्या विचारात आहे. असे असले तरी यासंदर्भातील निर्णय नितीन गडकरी यांच्या निर्देशानुसारच घेतला जाणार आहे.
बंटी कुकडे, सभापती परिवहन समिती