नागपुरात मनपाची आजपासून अतिक्रमण हटाव मोहीम : आयुक्तांचे आदेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 31, 2019 11:27 PM2019-12-31T23:27:44+5:302019-12-31T23:29:12+5:30
नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी बुधवारपासून शहरातील प्रमुख रस्ते व फूटपाथवरील अतिक्रमण हटविण्याची मोहीम राबविली जाणार आहे. आयुक्त अभिजित बांगर यांनी याबाबतचे आदेश दिले आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : शहरातील प्रमुख रस्ते व बाजार भागातील फूटपाथवर मोठ्या प्रमाणात अतिक्रमण करण्यात आले आहे. यामुळे नागरिकांना फूटपावरून चालता येत नाही. अशा नागरिकांच्या तकारी आहेत. फूटपाथ मोकळे नसल्याने पादचारी रस्त्यावरून चालतात. यामुळे रहदारीला अडथळा निर्माण होतो. अपघाताचा धोका वाढला आहे. महापौरांच्या ‘वॉक अॅन्ड टॉक विथ मेयर’ कार्यक्रम व जनता दरबारात फूटपाथवरील अतिक्रमण संदर्भात मोठ्या प्रमाणात तक्रारी आल्या होत्या. याची दखल घेत फूटपाथ व प्रमुख रस्ते मोकळे करण्याचे निर्देश महापौर संदीप जोशी यांनी दिले होते. त्यानुसार नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी बुधवारपासून शहरातील प्रमुख रस्ते व फूटपाथवरील अतिक्रमण हटविण्याची मोहीम राबविली जाणार आहे. आयुक्त अभिजित बांगर यांनी याबाबतचे आदेश दिले आहेत.
महापौरांच्या ‘वॉक अँड टॉक विथ मेयर’ उपक्रमामध्ये प्रत्येक ठिकाणी रस्ते, फूटपाथवरील अतिक्रमणाच्या समस्या मांडल्या जात होत्या. रस्त्यांवरील वाहनांचे पार्किंग, फूटपाथवरील दुकाने, हातठेले आदींमुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागत असल्याच्या अनेक तक्रारी महापौरांपुढे मांडण्यात आल्या होत्या.
शहरातील वाढत्या अतिक्रमणासंदर्भात स्थायी निर्णय घेण्यासाठी महापौरांनी ज्येष्ठ नगरसेवक दयाशंकर तिवारी यांच्या अध्यक्षतेत समिती गठित केली होती. या समितीने अहवाल तयार केला आहे. यात अतिक्रमण हटविण्याची शिफारस केली असून हा अहवाल सभागृहात सादर केला जाणार आहे. तत्पूर्वीच अतिक्रमण हटविण्याची मोहीम राबविण्याचे आदेश देण्यात आले आहे.
पोलीस बंदोबस्तात कारवाई
आयुक्तांच्या आदेशानुसार शहरातील रस्ते तसेच फूटपाथ मोकळे करण्यासाठी बुधवारपासून कठोर कारवाई केली जाणार आहे. विशेष म्हणजे, अतिक्रमणाच्या समस्येपासून नागरिकांना दिलासा मिळावा यासाठी ही मोहीम प्रभावीपणे राबविली जाणार आहे. मोहीम दिवस-रात्र चालणार आहे. परंतु अतिक्रमण कारवाईला होणारा विरोध लक्षात घेता पोलीस बंदोबस्तात ही कारवाई केली जाणार आहे.
तातडीने फूटपाथ दुरुस्ती
फूटपाथवर मोठ्या प्रमाणात अतिक्रमण करण्यात आले आहे. तसेच फूटपाथ ठिकठिकाणी नादुरुस्त आहेत. कुठे गट्टू निघाले असून कुठे काँक्रिट निघाले आहे. यामुळेही नागरिकांना फूटपाथवरून चालता येत नाही. याची दखल घेत महापौरांनी फूटपाथची तातडीने दुरुस्ती करण्याचे निर्देश दिले आहे. यासाठी ७ कोटींची तरतूद केली जाणार आहे.