मनपा : विकास कामांच्या फाईल्स परत!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 6, 2020 12:46 AM2020-02-06T00:46:20+5:302020-02-06T00:47:18+5:30
तुकाराम मुंढे यांनी आयुक्तपदाची सूत्रे स्वीकारताच बांगर यांच्याकडे प्रलंबित असलेल्या सर्व फाईल्स प्रशासनाकडून परत पाठविल्या जात आहेत. यामुळे प्रभागातील मूलभूत सुविधांची कामे बाधित होण्याची शक्यता आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : महापालिकेच्या स्थायी समितीने मंजुरी दिल्यानंतर प्रशासकीय मंजुरीसाठी फाईल्स पाठविल्या जातात. आयुक्तांच्या मंजुरीनंतर कार्यादेश दिले जातात. महिनाभरापूर्वी नगरसेवकांनी प्रभागातील विकास कामांच्या फाईल्स तत्कालीन आयुक्त अभिजित बांगर यांच्याकडे मंजुरीसाठी पाठविल्या होत्या. मंजुरी मिळताच कामाला सुुरुवात केली जाणार होती. दरम्यान तुकाराम मुंढे यांनी आयुक्तपदाची सूत्रे स्वीकारताच बांगर यांच्याकडे प्रलंबित असलेल्या सर्व फाईल्स प्रशासनाकडून परत पाठविल्या जात आहेत. यामुळे प्रभागातील मूलभूत सुविधांची कामे बाधित होण्याची शक्यता आहे.
प्रभाग क्रमांक १७ मधील ४३ लाखांच्या सिमेंट रस्त्याच्या कामाला मंजुरी देण्यात आली होती. स्थायी समितीच्या मंजुरीनंतर प्रशासकीय मंजुरीसाठी आयुक्तांकडे फाईल पाठविण्यात आली होती. परंतु तीन आठवडे फाईल आयुक्तांकडे प्रलंबित होती. बांगर यांची बदली होताच प्रशासकीय मंजुरी न देता फाईल परत पाठविण्यात आली आहे. या प्रभागातील रस्ते नादुरुस्त आहेत. ठिकठिकाणी खड्डे पडलेले आहेत. याचा विचार करता कार्यकारी अभियंता यांनी ही फाईल तयार केली होती.बांगर यांच्याकडे प्रलंबित असलेल्या सर्वच फाईल्स परत केल्याची माहिती नगरसेवकांनी दिली.
१९०० व ५७२ अभिन्यास नासुप्रने महापालिकेला नागरी सुविधांची देखभाल व दुरुस्तीसाठी हस्तांतरित केले. अशा अभिन्यासात रस्ते, गडरलाईन, नळाच्या दुरुस्तीची गरज आहे. त्यानुसार स्थायी समितीने अर्थसंकल्पात तरतूद केली आहे. आवश्यक असलेल्या विकास कामांना स्थायी समितीने मंजुरी दिली, परंतु प्रशासकीय मंजुरी देण्याचे काम थांबविण्यात आले आहे. महापालिकेच्या तिजोरीत जमा होणारा पैसा विचारात घेऊन आवश्यकतेनुसार विकास कामांना प्रशासकीय मंजुरी देण्याचे धोरण नवीन आयुक्तांनी स्वीकारल्याने स्थायी समितीने मंजुरी दिलेल्या शेकडो फाईल्स परत पाठविण्यात आल्या आहेत. याचे पडसाद महापालिकेच्या २० फेब्रुवारीच्या सर्वसाधारण सभेत उमटण्याची शक्यता आहे.
नगरसेवकांची धावपळ थांबली
प्रभागातील २५ ते ५० लाखापर्यंतच्या विकास कामांना स्थायी समितीची मंजुरी मिळताच, नगरसेवक स्वत: फाईल घेऊ न आयुक्तांकडे सहीसाठी जात होते. यासाठी नगरसेवकांची स्थायी समिती व आयुक्त कार्यालयात वर्दळ असायची. परंतु तुकाराम मुंढे यांनी आयुक्तपदाची सूत्रे स्वीकारताच नगरसेवकांची धावपळ थांबली आहे. आता हातात फाईल असलेले नगरसेवक शोधूनही सापडत नाही.