ई-कचरा व्यवस्थापनातून मनपाला मिळणार महसूल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 3, 2021 04:07 AM2021-06-03T04:07:00+5:302021-06-03T04:07:00+5:30
नागपूर : ई-कचरा ही मोठी समस्या आहे. नागरिकांच्या घरी वषानुवर्षे हा कचरा तसाच पडलेला आहे. ही ...
नागपूर : ई-कचरा ही मोठी समस्या आहे. नागरिकांच्या घरी वषानुवर्षे हा कचरा तसाच पडलेला आहे. ही बाब लक्षात घेता शहरातील ई-कचऱ्याचे योग्यरित्या संकलन आणि व्यवस्थापन करून त्याची विल्हेवाट लावली जाणार आहे. सोबतच यापासून मनपाला महसूल प्राप्त होणार आहे. याबाबतचा प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश स्थायी समिती अध्यक्ष प्रकाश भोयर यांनी अर्थसंकल्पात संबंधित विभागाला दिले आहेत.
संपूर्ण देशामध्ये सर्वाधिक ई-कचरा निर्माण होणाऱ्या दहा शहरांमध्ये शहराचा समावेश आहे. शहरात कचरा व्यवस्थापनासाठी दोन स्वतंत्र कपन्यांना नियुक्त करून सुसूत्रता आणण्यात आली आहे. मात्र, ई-कचऱ्याची विल्हेवाट लावण्याची व्यवस्था नागपूर शहरामध्ये नाही. त्यादृष्टीने ही महत्वपूर्ण संकल्पना महापौरांनी मांडली आहे. मनपाच्या माध्यमातून वेंडर निर्धारित करून ई-कचऱ्याची त्याला विक्री करण्यात आली व त्या वेंडरला शासकीय धोरणानुसार व नियमानुसार ई-कचऱ्याची विल्हेवाट लावण्याचे काम देण्यात आल्यास शहरातील ई-कचरा संपुष्टात येईल. याशिवाय या कचऱ्यातून नागपूर महानगरपालिकेला वर्षाला ४ ते ५ कोटी रुपये उत्पन्न होणे अपेक्षित आहे. प्रायोगिक तत्त्वावर शहरातील कचरा संकलन एजन्सीमार्फत आठवड्यातील एक दिवस संपूर्ण शहरातून केवळ ई-कचरा संकलित करून त्याची विल्हेवाट लावण्यासंदर्भात आवश्यक कार्यवाही करण्याचे निर्देश महापौरांनी प्रशासनाला दिले आहेत.