रासेयोच्या विद्यार्थ्यांना मनपा देणार अग्निसुरक्षेचे प्रशिक्षण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 15, 2021 04:08 AM2021-04-15T04:08:49+5:302021-04-15T04:08:49+5:30
अग्निशमन सेवा दिन : शहिदांना आदरांजली लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : आगीच्या घटनांमध्ये कर्तव्य बजावताना शहीद झालेल्या ...
अग्निशमन सेवा दिन : शहिदांना आदरांजली
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : आगीच्या घटनांमध्ये कर्तव्य बजावताना शहीद झालेल्या जवानांच्या स्मृतिप्रीत्यर्थ त्यांच्या नावे अग्निशमन महाविद्यालय सुरू करणारी नागपूर महापालिका देशातील पहिली आहे. नागपूर विद्यापीठाच्या सहकार्याने राष्ट्रीय सेवा योजनेच्या विद्यार्थ्यांना अग्निसुरक्षेचे प्रशिक्षण देण्याचा उपक्रम सुरू करणार असल्याची इच्छा महापौर दयाशंकर तिवारी यांनी व्यक्त केली.
अग्निशमन दिनानिमित्त मनपा मुख्यालयाच्या हिरवळीवर आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी नागरिकांचे प्राण वाचविताना शहीद झालेल्या जवानांना महापौर दयाशंकर तिवारी आणि आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी आदरांजली वाहिली. नागपूर मनपाअंतर्गत असलेल्या अग्निशमन सेवेतील जे जवान कर्तव्यादरम्यान शहीद झाले, त्यांच्या कुटुंबांतील सदस्याला नोकरी आणि आर्थिक मदत दिली. परंतु त्यांच्या स्मृती कायम राहाव्या यासाठी शहिदांच्या नावानेच मनपाने अग्निशमन महाविद्यालय सुरू केले. त्यातून अनेकांनी प्रशिक्षण घेतल्याचे महापौर म्हणाले.
यावेळी अग्निशमन व विद्युत विशेष समितीचे सभापती दीपक चौधरी, अतिरिक्त आयुक्त राम जोशी, संजय निपाने, प्रभारी उपायुक्त महेश धामेचा, प्रमुख अग्निशमन अधिकारी राजेंद्र उचके, केंद्राधिकारी तुषार बाराहाते, स्थानाधिकारी राजेंद्र दुबे, मोहन गुडधे आदी उपस्थित होते. यावेळी शहिदांना मानवंदना देण्यात आली. कार्यक्रमाला अग्निशमन विभागाचे प्रमुख अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.