बालकांसाठी मनपा तयार करणार स्वतंत्र वॉर्ड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 8, 2021 11:37 PM2021-05-08T23:37:35+5:302021-05-08T23:39:08+5:30
NMC will set up a separate ward for children कोरोना संकट दिवसेंदिवस वाढत आहे. पहिली लाट ही ज्येष्ठांसाठी अधिक घातक होती. दुसरी लाट ज्येष्ठांसोबत तरुणांसाठी धोकादायक ठरत आहे. संभाव्य तिसरी लाट लहान मुलांसाठी घातक ठरण्याचा इशारा वैद्यकीय तज्ज्ञांनी दिला आहे. लहान मुले आणि बालकांच्या संरक्षणासाठी गठित करण्यात आलेल्या टास्क फोर्सच्या सूचनांनुसार महापालिका नियोजन करीत आहे. लहान मुलांसाठी रुग्णालयात स्वतंत्र वॉर्ड सज्ज ठेवण्याच्या दृष्टीने मनपाची यंत्रणा कामाला लागली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कोरोना संकट दिवसेंदिवस वाढत आहे. पहिली लाट ही ज्येष्ठांसाठी अधिक घातक होती. दुसरी लाट ज्येष्ठांसोबत तरुणांसाठी धोकादायक ठरत आहे. संभाव्य तिसरी लाट लहान मुलांसाठी घातक ठरण्याचा इशारा वैद्यकीय तज्ज्ञांनी दिला आहे. लहान मुले आणि बालकांच्या संरक्षणासाठी गठित करण्यात आलेल्या टास्क फोर्सच्या सूचनांनुसार महापालिका नियोजन करीत आहे. लहान मुलांसाठी रुग्णालयात स्वतंत्र वॉर्ड सज्ज ठेवण्याच्या दृष्टीने मनपाची यंत्रणा कामाला लागली आहे.
मुलांवर उपचारांसाठी स्वतंत्र कक्ष, बेडची संख्या वाढविणे, व्हेंटिलेटर यांची व्यवस्था केली जात आहे. टास्क फोर्सच्या सूचनेनुसार आवश्यक सुविधा निर्माण केल्या जातील. याबाबत प्राथमिक स्तरावर तयारी सुरू केली आहे. लहान मुलांच्या लसीकरणासंदर्भात शासनाकडून प्राप्त होणाऱ्या दिशानिर्देशानुसार काम केले जाईल, अशी माहिती मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी ‘लोकमत’ला दिली.
सहा महिन्यांनंतर लाटेची शक्यता
कोरोनाची तिसरी लाट येईल. परंतु ती कधी येईल हे सांगता येत नाही. साधारणत: सहा महिन्यांनी तिसरी लाट येण्याची शक्यता आहे. परंतु याची प्रतीक्षा न करता मनपाने लहान मुलांवर उपचार सुविधा निर्माण करण्याची तयारी सुरू केली आहे. मनपाचे इंदिरा गांधी रुग्णालय, आयुष, आयसोलेशन, पाचपावली आदी ठिकाणी काेविड रुग्णांवर उपचाराची सुविधा केली आहे. या रुग्णालयांत लहान मुलांसाठी स्वतंत्र वॉर्ड निर्माण करण्याची तयारी सुरू केल्याची माहिती अतिरिक्त आयुक्त राम जोशी यांनी दिली.
बालरोग तज्ज्ञांची नियुक्ती करणार
तिसऱ्या लाटेत बालकांना कोरोनाची बाधा होण्याचा धोका विचारात घेता मनपा रुग्णालयात बालकांसाठी स्वतंत्र वॉर्ड निर्माण करण्यात येईल. येथे ऑक्सिजन, व्हेंटिलेटरची व्यवस्था केली जाईल. तसेच बालरोग तज्ज्ञ, परिचारिका व कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली जाणार आहे. त्यादृष्टीने मनपाने तयारी सुरू केली आहे.