चेक बाऊन्समुळे मनपाची आर्थिक कोंडी
By admin | Published: May 29, 2017 02:53 AM2017-05-29T02:53:10+5:302017-05-29T02:53:10+5:30
शासकीय स्तरावर आर्थिक व्यवहार रोखीने न करता चेक किंवा आॅनलाईन करण्यासाठी प्रोत्साहित केले जात आहे.
मालमत्ता कर विभागाचे प्रकरण : ३ कोटी रुपयांचे ७६५ चेक बाऊन्स
राजीव सिंह।
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : शासकीय स्तरावर आर्थिक व्यवहार रोखीने न करता चेक किंवा आॅनलाईन करण्यासाठी प्रोत्साहित केले जात आहे. मात्र, हे धोरण नागपूर महापालिकेसाठी डोकेदुखी ठरत आहे. या व्यवस्थेमुळे मालमत्ता कर विभागाची तब्बल तीन कोटी पाच लाख रुपयांची कोंडी केली आहे. एवढ्या रकमेचे तब्बल ७६५ चेक वेगवेगळ्या कारणांनी बाऊन्स झाले आहेत. आता चेक बाऊन्सची प्रकरणे निकाली काढण्यासाठी मालमत्ता कर विभागाने आपल्या कर्मचाऱ्यांवर जबाबदारी सोपविली आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार ७१ लाख ९३ हजार रुपयांच्या १५६ चेकचे प्रकरण निकाली निघाले आहे. झोन स्तरावर आता मालमत्ता विभागाकडे संबंधित चेक वटविण्याची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. सद्यस्थितीत मालमत्ता कर हेच महापालिकेच्या उत्पन्नाचे मुख्य साधन आहे. त्यामुळे आर्थिक वर्ष संपल्यानंतरही मालमत्ता विभागाचे काम जोरात सुरू आहे. एप्रिल व मे या दोन महिन्यात तब्बल १२ कोटी रुपयांची वसुली करण्यात आली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत वसुली एक कोटींनी जास्त आहे.
अपर आयुक्त रवींद्र कुंभारे यांनी काही दिवसांपूर्वी कर विभागाचे अधिकारी व सहायक आयुक्तांची बैठक घेऊन कर संकलन व्यवस्थेचा आढावा घेतला होता. चेक बाऊन्स प्रकरणांचा त्वरित निपटारा करण्याचे व गरज भासल्यास संबंधितांविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्याचे निर्देशही त्यांनी दिले होते.