श्री गणेश टेकडी मंदिराला मनपाची नोटीस
By admin | Published: July 8, 2016 02:52 AM2016-07-08T02:52:12+5:302016-07-08T02:52:12+5:30
भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या सीताबर्डी येथील श्री गणेश टेकडी मंदिराचा मुख्य भाग शिकस्त झाला आहे.
मंदिराचा मुख्य भाग शिकस्त : भाविकांच्या सुरक्षेचा प्रश्न
नागपूर : भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या सीताबर्डी येथील श्री गणेश टेकडी मंदिराचा मुख्य भाग शिकस्त झाला आहे. यामुळे भाविकांच्या सुरक्षेचा विचार करता मंदिराचा शिकस्त भाग पाडण्यात यावा, यासाठी गुुरुवारी महापालिकेच्या धरमपेठ झोनच्या सहायक आयुक्तांनी मंदिराचे अध्यक्षांना नोटीस बजावली आहे.
झोनच्या बांधकाम विभागातील अधिकाऱ्यांनी काही दिवसांपूर्वी या मंदिराची पाहणी केली होती. मंदिराच्या गाभाऱ्यावरील स्लॅब, मंदिराचे कॉलम व इतर भाग शिकस्त झाल्याचे पाहणीदरम्यान निदर्शनास आले होेते. येथे होणारी भाविकांची गर्दी विचारात घेता सुरक्षेच्या दृष्टीने मंदिराचा शिकस्त भाग पाडून नवीन बांधकाम करण्याची गरज आहे. ही बाब विचारात घेता झोनचे सहायक आयुक्त प्रकाश वराडे यांनी शिकस्त भाग सात दिवसांत पाडण्यात यावा, अशी सूचना महाराष्ट्र म्युनिसिपल अॅक्ट कलम २६४ अन्वये बजावलेल्या नोटीसद्वारे मंदिर व्यवस्थापनाला केली आहे. (प्रतिनिधी)
मंदिर शिकस्त
झाल्याने नोटीस
झोन अधिकाऱ्यांनी काही दिवसांपूर्वी श्री गणेश टेकडी मंदिराची पाहणी केली होती. यात मंदिराचा मुख्य भाग, स्लॅब व कॉलम शिकस्त झाल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे सार्वजनिक सुरक्षा विचारात घेता कायद्यातील तरतुदीनुसार मंदिराचे अध्यक्षांना नोटीस बजावण्यात आली आहे.
- प्रकाश वराडे, सहायक आयुक्त