वाढत्या संक्रमणामुळे मनपा कर्मचारी दहशतीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 7, 2020 10:50 PM2020-08-07T22:50:55+5:302020-08-07T22:52:45+5:30
कोविड-१९ महामारीच्या काळातही महापालिकेचे अधिकारी व कर्मचारी पूर्ण ताकदीने काम करीत होते. या काळात अग्निशमन विभाग, आरोग्य विभाग, झोन कार्यालयांनी महत्त्वाची भूमिका बजावली. मात्र आता संक्रमण वाढत असल्याने संबंधित विभागाच्या कर्मचाऱ्यांवर त्याचा प्रभाव पडायला लागला आहे. अधिकारी व कर्मचारी संक्रमित होऊ लागल्याने महापालिकेच्या कर्मचाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कोविड-१९ महामारीच्या काळातही महापालिकेचे अधिकारी व कर्मचारी पूर्ण ताकदीने काम करीत होते. या काळात अग्निशमन विभाग, आरोग्य विभाग, झोन कार्यालयांनी महत्त्वाची भूमिका बजावली. मात्र आता संक्रमण वाढत असल्याने संबंधित विभागाच्या कर्मचाऱ्यांवर त्याचा प्रभाव पडायला लागला आहे. अधिकारी व कर्मचारी संक्रमित होऊ लागल्याने महापालिकेच्या कर्मचाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
उल्लेखनीय म्हणजे २४ तास सेवेत तत्पर असलेल्या अग्निशमन विभागाचे एका पाठोपाठ एक १६ अधिकारी व कर्मचारी संक्रमित झाले आहेत. यानंतरही काही कक्ष बंद करून विभागाचे कर्मचारी कार्यरत राहिले. दुसरीकडे आरोग्य विभागामधूनही काही कर्मचारी पॉझिटिव्ह आढळून आले आणि आता झोन कार्यालयातही कोविडने शिरकाव केला आहे. प्राप्त माहितीनुसार गांधीबाग झोनचे अर्धा डझन अधिकारी पॉझिटिव्ह निघाले. त्यांच्या संपर्कात आलेल्या डझनभर कर्मचाऱ्यांना क्वारंटाईन करण्यात आले आहे. झोनचे सहायक आयुक्त, वैद्यकीय अधिकारी, झोन अधिकारी व काही कर्मचाऱ्यांचा यात समावेश आहे. विशेष म्हणजे गांधीबाग झोन मे महिन्यापासूनच रेड झोनमध्ये आलेले आहे. या भागात मोठ्या संख्येने नागरिकांना विलगीकरणात ठेवण्यात आले आहे आणि यावेळी संबंधित अधिकाऱ्यांनी प्रचंड मेहनत घेतली होती. सहायक आयुक्त यांनी अतिक्रमण विभागाचेही कार्य सांभाळले होते. त्यामुळे अतिक्रमण विभागावरही संक्रमणाचा धोका वाढला आहे.
याशिवाय धरमपेठ झोनचे झोन अधिकारी संक्रमणानंतर बरे होऊन घरी परतले आहेत. लकडगंज झोनचे एक-दोन अधिकारी पॉझिटिव्ह निघाले. शुक्रवारी दिवसभर नगर रचना विभागाचे कर्मचारी पॉझिटिव्ह निघाल्याची चर्चा सुरू होती. मात्र विभागामधून कुणीही संक्रमित झाल्याचे स्पष्ट झाले नाही.
अतिक्रमण कारवाईत संक्रमणाचा धोका
लॉकडाऊनच्या नियमात शिथिलता आल्यानंतर व अनलॉकची प्रक्रिया सुरू झाल्यानंतर अतिक्रमण विरोधी कारवाईला वेग आला. कारवाईत सहभागी मनपा कर्मचारी व पोलीस कर्मचाऱ्यांवर संक्रमणाचा धोका अधिक आहे. कारवाईदरम्यान मोठ्या प्रमाणात गर्दी होते. यामध्ये कोण संक्रमित आहे आणि कोण नाही, याचा पत्ता लागणे कठीण आहे. यामुळे अधिकारी व कर्मचाऱ्यांवरही संक्रमणाची दहशत कायम आहे.