मनपा मालमत्ता करवसुली : उद्दिष्ट अवघड, अधिकारी टेन्शनमध्ये!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 24, 2020 10:59 PM2020-02-24T22:59:52+5:302020-02-24T23:01:43+5:30

आर्थिक वर्ष संपण्याला ३६ दिवसांचाच कालावधी शिल्लक आहे. प्रयत्न करूनही मालमत्ता कराची २३ फेब्रुवारीपर्यंतची वसुली २०० कोटी आहे. आणखी जोर लावला तरी हा आकडा २५० ते २६० कोटींच्या पुढे जाण्याची शक्यता नाही.

Municipal Property Taxation: Purpose difficult, in officer tension! | मनपा मालमत्ता करवसुली : उद्दिष्ट अवघड, अधिकारी टेन्शनमध्ये!

मनपा मालमत्ता करवसुली : उद्दिष्ट अवघड, अधिकारी टेन्शनमध्ये!

Next
ठळक मुद्दे२३ फेब्रुवारीपर्यंत फक्त २०० कोटी जमा

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : आर्थिक वर्ष संपण्याला ३६ दिवसांचाच कालावधी शिल्लक आहे. प्रयत्न करूनही मालमत्ता कराची २३ फेब्रुवारीपर्यंतची वसुली २०० कोटी आहे. आणखी जोर लावला तरी हा आकडा २५० ते २६० कोटींच्या पुढे जाण्याची शक्यता नाही. गेल्या वर्षी मालमत्ता करापासून २२८ कोटी जमा झाले होते. या वर्षी मालमत्ता कर विभागातील कर्मचारी व अधिकारी कामाला लागले होते. परंतु मनुष्यबळ नसल्याने अपेक्षित वसुली झाली नाही. अभिजीत बांगर यांच्या बदलीनंतर तुकाराम मुंढे यांनी आयुक्तपदाची सूत्रे स्वीकारताच मालमत्ता विभागावर वसुलीसाठी सर्वाधिक दबाव वाढल्याने अधिकारी टेन्शनमध्ये आले आहेत.
मुंढे यांनी झोननिहाय वसुलीचे उद्दिष्ट निर्धारित केले आहे. उद्दिष्टाच्या आसपास वसुली न झाल्यास झोनचे सहायक आयुक्त, कर अधीक्षक, निरीक्षक यांच्यासह संबंधित कर्मचाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारला जाणार आहे. यामुळे कर वसुलीसाठी अधिकारी व कर्मचारी मैदानात उतरले आहेत. परंतु ३६ दिवसांचाच कालावधी शिल्लक असल्याने उद्दिष्टाच्या आसपास वसुली होण्याची शक्यता नाही. सूत्रांच्या माहितीनुसार सुरुवातीला करवसुलीचे विभागाने ३०० कोटींचे लक्ष्य निर्धारित केले होते. परंतु मुंढे यांनी उद्दिष्ट वाढविले. स्थायी समितीने ४५० कोटींचे उद्दिष्ट दिले होते.
शिल्लक असलेल्या कालावधीत दररोज २ कोटींची वसुली झाली तरी ७२ कोटी जमा होतील. सध्या दररोज एक ते दीड कोटीची वसुली होत आहे. उद्दिष्ट पूर्ण न केल्यास आयुक्त संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांवर काय कारवाई करतात. याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

थकबाकीदारांचा प्रतिसाद नाही
महापालिकेच्या मालमत्ता विभागाने एकूण ५१४.३८ कोटींची थकबाकी काढली आहे. चालू आर्थिक वर्षातील मालमत्ता कर २३३.७३ कोटी आहे. अशा प्रकारे आर्थिक वर्षात एकूण ७४८.११ कोटींची वसुली करावयाची आहे. यातील १२९.९१ कोटीच्या थकीत प्रकरणांचा वाद न्यायालय वा प्राधिकरणात सुरू आहे. उर्वरित ६१८.२० कोटींच्या डिमांड काढण्यात आलेल्या आहेत. १ एप्रिल २०१९ ते २३ फेब्रुवारी २०२० पर्यंत मनपाने एकूण १९९.५३ कोटींची वसुली केली आहे. यातील थकबाकी ९४.३३ कोटी आहे. चालू करातून १०५.२० कोटी वसूल झाले आहेत.

कारवाईने जोर पकडला
मुंढे यांच्या दबावामुळे मालमत्ता विभागातील कर्मचारी व अधिकारी कामाला लागले आहेत. रविवारी सुटीच्या दिवशी थकबाकीदारांवर कारवाई करण्यात आली. सोमवारी आसीनगर झोनमध्ये कारवाई करण्यात आली. यात थकबाकीदारांच्या घरातील सोफा, फ्रीज, टीव्ही, टेबल, कूकर, असे साहित्य जप्त करण्यात आले. लॉन मालक पुरुषोत्तम शहाणे यांच्याकडे ५.८२. लाखांची थकबाकी आहे. त्यांच्यावर जप्ती कारवाई करण्यात आली. तसेच धरमपेठ झोनमध्ये ६ थकबाकीदारांवर जप्तीची कारवाई करण्यात आली. वॉशिंग मशीन, टीव्ही, जप्त करण्यात आले. तसेच थकबाकी वसूल करण्यात आली.

 

Web Title: Municipal Property Taxation: Purpose difficult, in officer tension!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.