मनपाची तिजोरी रिकामी
By admin | Published: April 16, 2017 01:46 AM2017-04-16T01:46:26+5:302017-04-16T01:46:26+5:30
शहराचा विस्तार प्रचंड वेगाने होतोय. याच वेगाने विकासकामे करायची तर मनपाच्या रिकाम्या तिजोरीचे मोठे आव्हान समोर आहे.
महापौरांची कबुली : वरुड परिसर मित्र परिवारातर्फे सत्कार
नागपूर : शहराचा विस्तार प्रचंड वेगाने होतोय. याच वेगाने विकासकामे करायची तर मनपाच्या रिकाम्या तिजोरीचे मोठे आव्हान समोर आहे. त्यामुळे पुढच्या काळात सामाजिक संस्थांची मदत घेऊनच मार्गक्रमण करावे लागेल, असे मत महापौर नंदा जिचकार यांनी व्यक्त केले. वरुड परिसर मित्र परिवार, नागपूरतर्फे शनिवारी त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी त्या बोलत होत्या. राष्ट्रभाषा संकुलात आयोजित या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शहराचे माजी महापौर कृष्णराव पांडव, प्रमुख अतिथी कृष्णा इन्स्टियूट आॅफ मेडिकल सायन्सेस, कराडचे कुलपती डॉ. वेदप्रकाश मिश्रा, डॉ. गिरीश गांधी यांच्यासह शरद जिचकार, माधव देशपांडे, कमलेश राठी व अनिल वरेकर मंचावर उपस्थित होते. महापौर पुढे म्हणाल्या, घरच्यांनी केलेला हा सत्कार स्वीकारून मला मनस्वी आनंद झाला आहे. पण, मी अजून सत्कार स्वीकारण्याइतके कुठलेही कार्य केलेले नाही. त्यामुळे म्हणायचेच असेल तर याला अभिनंदन सोहळा म्हणा. महापौरपदासोबतच एक मोठी जबाबदारी माझ्या शिरी आली आहे. पण, मी एकटी कितीही प्रयत्न केले तरी काही करू शकणार नाही. शहराला खरेच सुंदर व समृद्ध करायचे असेल तर लोकसहभाग महत्त्वाचा आहे. शहराच्या सर्वांगीण विकासासाठी लोकांनी स्वयंप्रेरणेने पुढे यायला हवे, असे आवाहन त्यांनी केले. डॉ. वेदप्रकाश मिश्रा म्हणाले, नंदा जिचकार यांची महापौरपदी निवड ही गुणवत्तेच्या आधारावर झाली आहे. त्या आपल्या गुणवत्तेने या शहराला सर्वांगसुंदर करतील याचा मला विश्वास आहे. कृष्णराव पांडव यांनी अध्यक्षीय भाषणात महिलांच्या क्षमता ओळखून त्यांना राजकारणात मोठ्या पदावर संधी दिली गेली पाहिजे, अशी अपेक्षा व्यक्त केली. प्रास्ताविक डॉ. गिरीश गांधी, संचालन डॉ. प्रदीप विटाळकर तर आभार माधव देशपांडे यांनी मानले.(प्रतिनिधी)