मनपा शाळा होणार डिजिटल
By admin | Published: May 12, 2016 03:01 AM2016-05-12T03:01:17+5:302016-05-12T03:01:17+5:30
महापालिका शाळांचा दर्जा उंचवावा, तसेच विद्यार्थ्यांना चांगल्या सुविधा उपलब्ध करण्याच्या दृष्टीने शिक्षण समितीने विविध उपक्रम हाती घेतले आहे.
शिक्षण समितीचा निर्णय : शाळांचा दर्जा उंचावण्याचे प्रयत्न
नागपूर : महापालिका शाळांचा दर्जा उंचवावा, तसेच विद्यार्थ्यांना चांगल्या सुविधा उपलब्ध करण्याच्या दृष्टीने शिक्षण समितीने विविध उपक्रम हाती घेतले आहे. यात सर्व शाळांना संगणक उपलब्ध के ले जाणार आहे. सोबतच प्रायोगिक तत्त्वावर पुढील सत्रापासून दहा शाळांत डिजिटल प्रकल्प राबविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सर्वशिक्षा अभियानाच्या माध्यमातून मागासवर्गीय विद्यार्थ्यांना गणवेश वाटप केले जाते. परंतु इतर मागासवर्गीय व खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ मिळत नाही.
या प्रवर्गातही मोठ्या संख्येने गरीब विद्यार्थी आहे. त्यामुळे सरसकट सर्व विद्यार्थ्यांना गणवेश,मोजे, बूट, दप्तर व शालेय साहित्य उपलब्ध करण्याचा निर्णय शिक्षण समितीने घेतला आहे.
विद्यार्थ्याना सुविधा उपलब्ध करण्यासोबतच शाळांत शैक्षणिक वातांवरण निर्माण व्हावे. यासाठी शाळांची रंगरंगोटी, पिण्याच्या पाण्याची सुविधा, खेळण्याचे साहित्य, पाठ्यपुस्तक योजना, शालेय पोषण आहार योजना, परिसराची स्वच्छता, शिक्षकांना प्रशिक्षण, पटसंख्या वाढ, स्नेहसंमेलनाचे आयोजन केले जाणार आहे. काही शाळांना आयएसओ दर्जा प्राप्त व्हावा. यासाठी प्रयत्न सुरू आहेत.
यामुळे महापालिका शाळांचा शैक्षणिक दर्जा उंचावत होत आहे. परिणामी सर्वसामान्यांचा महापालिका शाळांकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलत आहे. (प्रतिनिधी)