महापालिकेच्या शाळांना लागली घरघर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 11, 2021 04:07 AM2021-07-11T04:07:16+5:302021-07-11T04:07:16+5:30

नागपूर : इंग्रजी माध्यमांच्या खाजगी शाळांचे प्रस्थ वाढत असताना राज्य शासन व मनपाचे पदाधिकारी व प्रशासनाच्या उदासीनतेमुळे महापालिकांच्या शाळांना ...

Municipal schools started whining | महापालिकेच्या शाळांना लागली घरघर

महापालिकेच्या शाळांना लागली घरघर

Next

नागपूर : इंग्रजी माध्यमांच्या खाजगी शाळांचे प्रस्थ वाढत असताना राज्य शासन व मनपाचे पदाधिकारी व प्रशासनाच्या उदासीनतेमुळे महापालिकांच्या शाळांना अखेरची घरघर लागली आहे. गेल्या १५ वर्षात मनपाच्या तब्बल ८३ शाळा बंद पडल्या असून उरलेल्या १४८ पैकी ६८ शाळा मरणासन्न अवस्थेत पाेहचल्या आहेत. याच काळात शहरातील झाेपडपट्ट्या व तेथील लाेकसंख्या वाढली असतानाही मनपा शाळांमधील पटसंख्या १५ हजारापर्यंत खाली आली आहे. म्हणजे शहरातील केवळ ५.४८ टक्के विद्यार्थीच मनपाच्या शाळांमध्ये शिक्षण घेत आहेत.

शासकीय शाळांची दुरवस्था व गुणवत्तापूर्ण शिक्षणाच्या अभावामुळे गरीब विद्यार्थ्यांना महागड्या शाळांमध्ये शिक्षण घेण्याशिवाय गत्यंतर उरलेले नाही. लाेकप्रतिनिधी आणि प्रशासकीय यंत्रणेच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे शासकीय शाळांची अवस्था दयनीय हाेत गेली. जणू यांनी खाजगी शाळांसाठी पाेषक परिस्थितीच निर्माण केली. मग हळूहळू मनपाच्या एकएक शाळा बंद पडत गेल्या व इंग्रजी माध्यमाच्या खाजगी शाळा वाढत गेल्या. २००५-०६ मध्ये नागपूर शहराची लाेकसंख्या १८ लाख असताना २३१ शाळा सुरू हाेत्या. त्यावेळी विद्यार्थी पटसंख्या हाेती ४२ हजार ३८३. आज शहराची लाेकसंख्या ३० लाखाच्या घरात पाेहचली असताना मनपाच्या शाळा उरल्या आहेत १४८ व पटसंख्या १५१२४ विद्यार्थी. त्यातही ६८ शाळा मरणासन्न अवस्थेत असून दाेन चार वर्षात त्यांनाही टाळे लागण्याची चिन्हे आहेत. २०१८-१९ च्या आकडेवारीनुसार शहरात एक ते बारावीपर्यंत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या हाेती ३ लाख १० हजार ५१३. त्यापैकी इंग्रजी माध्यमाच्या खाजगी शाळांमध्ये २ लाख ९० हजार म्हणजे ५६.७६ टक्के विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. ३१.७८ टक्के विद्यार्थी स्वायत्त शाळांमध्ये तर ५.९ टक्के विनाअनुदानित शाळेत.

याचे कारण ठेवीले अनंते... या उक्तीप्रमाणे शासकीय शाळांच्या अवस्थेत काळानुरूप बदल करण्यासाठी कुणीही पुढाकार घेतला नाही. अनेक वर्षाचे बांधकाम असलेल्या शाळांच्या इमारती जर्जर झाल्या. शाैचालय, पाणी, वातावरण, स्वच्छता अशा मूलभूत सुविधांचीही पूर्तता करण्याकडे लक्ष दिले गेले नाही. गुणवत्तापूर्ण शिक्षणाची व्यवस्था दूरच राहिली. या कारणाने पालकांनी हळूहळू या शाळांकडे पाठ फिरवली व खाजगी शाळांचे खिसे भरत गेले.

Web Title: Municipal schools started whining

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.