मनपा शिक्षकांची विद्यार्थ्यांच्या वस्तीत शाळा!()
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 22, 2021 04:06 AM2021-07-22T04:06:46+5:302021-07-22T04:06:46+5:30
सेतू अभ्यासक्रमाचा दिलासा : ऑनलाईन व ऑफलाईन अभ्यास लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : कोविड संक्रमणामुळे गेल्या वर्षात शाळा ...
सेतू अभ्यासक्रमाचा दिलासा : ऑनलाईन व ऑफलाईन अभ्यास
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कोविड संक्रमणामुळे गेल्या वर्षात शाळा बंद होत्या. विद्यार्थी उत्तीर्ण होऊन पुढच्या वर्गात गेले. परंतु मागील वर्षात अभ्यासक्रम घेता आला नाही. राहिलेल्या अभ्यासासाठी सेतू अभ्यासक्रम राबविला जात आहे. महापालिकेचे शिक्षक विद्यार्थ्यांच्या घरोघरी व त्यांच्या वस्तीत शाळा भरवत आहेत.
मनपाच्या १२९ प्राथमिक तर २९ माध्यमिक शाळा आहेत. १८ हजाराहून अधिक विद्यार्थी आहेत. मनपा शाळात प्रामुख्याने झोपडपट्टी, गरीब व मध्यमवर्गीय कुटुंबातील विद्यार्थी शिक्षण घेतात. आज स्पर्धेच्या युगात मनपा शाळातील विद्यार्थी मागे राहू नये, यासाठी मनपाच्या शिक्षण विभागाने सेतू अभ्यासक्रम प्रभावीपणे राबविण्याचा निर्णय घेतला आहे. या संदर्भात मुख्याध्यापक, शाळा निरीक्षक व शिक्षकांच्या बैठकी घेण्यात आल्या. उपक्रमापासून एकही विद्यार्थी वंचित राहू नये अशा सूचना देण्यात आल्या.
ऑनलाईन व ऑफलाईन अशा दोन्ही पध्दतीने हा अभ्यास घेतला जात आहे. मनपा शाळातील जवळपास ५० टक्के विद्यार्थ्यांकडे स्मार्ट फोन नाहीत. अशा विद्यार्थ्यांच्या घरी वा वस्तीत जाऊन मनपा शिक्षक शाळा भरवत आहेत. याला चांगला प्रतिसाद मिळत आहे. कुठे मोकळ्या मैदानात तर कुठे झाडाखाली शाळा भरत आहे. सेतू उपक्रमाला १ जुलैपासून सुरुवात झाली. १५ ऑगस्टपर्यंत हा उपक्रम राबविला जाणार आहे.
...
दीक्षा अॅपवर अभ्यास उपलब्ध
दीक्षा अॅपवर अभ्यासक्रम उपलब्ध करण्यात आला आहे. तसेच व्हॉटसॲपवर अभ्यास पाठवून विद्यार्थ्यांकडून सोडवून घेतला जात आहे. दुसऱ्या दिवशी दिलेला अभ्यास सोडविला की नाही याची पडताळणी केली जाते. मोबाईल नसलेल्या विद्यार्थ्यांच्या घरी जाऊन शिक्षक अभ्यास घेत आहेत.
....
मोबाईल नसलेल्या विद्यार्थ्यांचा ऑफलाईन अभ्यास
मनपा शाळातील ४५ ते ५० टक्के विद्यार्थ्यांकडे स्मार्ट फोन वा लॅपटॉप सुविधा नाही. अशा विद्यार्थ्यांच्या घरी वा वस्तीत जाऊन मनपाचे शिक्षक वर्ग घेत आहेत. यासंदर्भात मुख्याध्यापक, शाळा निरीक्षक यांना सूचना केल्या आहेत. १५ ऑगस्ट नंतर विद्यार्थ्यांची झालेल्या अभ्यासावर परीक्षा घेतली जाईल. मनपा शाळातील विद्यार्थी अभ्यासात मागे राहू नये, यासाठी प्रयत्न सुरू असल्याची माहिती शिक्षण सभापती. दिलीप दिवे यांनी दिली.