मनपा परिवहन विभागाचा २४६ कोटीचा अर्थसंकल्प
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 16, 2021 09:30 PM2021-03-16T21:30:12+5:302021-03-16T21:34:14+5:30
Municipal Transport Department's budget, Nagpur news महापालिकेचे परिवहन व्यवस्थापक रवींद्र भेलावे यांनी मंगळवारी परिवहन विभागाचा सन २०२०-२१ चा सुधारित ७७.०३ कोटीचा तर २०२१-२२ या वर्षाचा २४६.०४ कोटींचा प्रस्तावित अर्थसंकल्प परिवहन सभापती बाल्या बोरकर यांना सादर केला.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : महापालिकेचे परिवहन व्यवस्थापक रवींद्र भेलावे यांनी मंगळवारी परिवहन विभागाचा सन २०२०-२१ चा सुधारित ७७.०३ कोटीचा तर २०२१-२२ या वर्षाचा २४६.०४ कोटींचा प्रस्तावित अर्थसंकल्प परिवहन सभापती बाल्या बोरकर यांना सादर केला.
शहराला प्रदूषण मुक्त करण्यासाठी २३७ स्टॅण्डर्ड बसचे सीएनजीमध्ये रूपांतर करण्याची प्रक्रिया सुरू आहे. यातील ५५ बसेस परिवर्तित झालेल्या आहेत. केंद्र सरकारकडून १०० इलेक्ट्रिक बसला मंजुरी मिळाली होती. परंतु यात मनपाला २० कोटीचा वाटा उचलावयाचा होता. आर्थिक बोजा मोठा असल्याने ४० इलेक्ट्रिक बस सुरू करणार आहेत.
कोविड संक्रमणामुळे २३ मार्च ते २७ ऑक्टोबर २०२० यादरम्यान आपली बस सेवा पूर्णपणे बंद होती. याचा परिणाम अर्थसंकल्पावर झाला. सन २०२०-२१ च्या सुधारित अर्थसंकल्पात ७७.०३ कोटी उत्पन्न अपेक्षित असून ७६.८६ कोटी खर्च अपेक्षित आहे. कोविड सेवेत ६० बसेस होत्या. २८ ऑक्टोबर २०२० पासून टप्प्याटप्प्याने बससेवा सुरू करण्यात आली. परिवहन विभागाच्या परिचलनाकरिता शहर परिवहन निधी तसेच महसुलाचा विनियोग करण्यासाठी महसूल राखीव निधी असे स्वतंत्र शीर्ष निर्माण करण्यात आले आहे. परिवहन सुधारणा निधी स्थापन करण्यात आला आहे.
२५२ बस सुरू
कोविड संक्रमणामुळे परिवहन सेवा विस्कळीत झाली आहे. ४३७ पैकी सध्या स्टॅण्डर्ड बस १५३, मिडी बस ७३ व मिनी २१, इलेक्ट्रिक ५ बस अशा २५२ बस सध्या शहरात धावत आहेत.
ठळक बाबी
- स्मार्ट थांबे उभारणार
- ४० इलेक्ट्रिक मिडी बससाठी १४ कोटी अनुदान
- इलेक्ट्रिक बससाठी खापरी येथे डेपो उभारणार
- बसथांबा फलकासाठी ७५ लाखांची तरतूद
- २३७ स्टॅण्डर्ड बसचे सीएनजीमध्ये रूपांतर
- खापरी येथील वर्कशॉप दुरुस्तीसाठी तरतूद
- चलो अॅपची मोफत सुविधा उपलब्ध