न.प.च्या धर्तीवर मनपाची प्रभाग रचना

By admin | Published: July 6, 2016 03:07 AM2016-07-06T03:07:30+5:302016-07-06T03:07:30+5:30

राज्यातील नगरपालिकांच्या आगामी निवडणुका विचारात घेता, राज्य निवडणूक आयोगाने दोन सदस्यीय प्रभागाचा आराखडा तयार केला आहे.

Municipal Ward Composition on NP | न.प.च्या धर्तीवर मनपाची प्रभाग रचना

न.प.च्या धर्तीवर मनपाची प्रभाग रचना

Next

महापालिकेला निर्देशाची प्रतीक्षा : आयोगाला माहिती पाठविली
नागपूर : राज्यातील नगरपालिकांच्या आगामी निवडणुका विचारात घेता, राज्य निवडणूक आयोगाने दोन सदस्यीय प्रभागाचा आराखडा तयार केला आहे. यासाठी २०११ ची लोकसंख्या व नकाशाचा आधार घेतला आहे. याच धर्तीवर महापालिकेच्या चार सदस्यीय प्रभागांची रचना राहण्याची शक्यता निवडणूक विभागातील अधिकाऱ्यांनी व्यक्त केली.
महापालिका निवडणुकीपूर्वी नगरपालिकांच्या निवडणुका असल्याने या निवडणुकीची तयारी सुरू आहे. सप्टेंबर महिन्यात महापालिकांची प्रभाग रचना व आरक्षण जाहीर होण्याची शक्यता आहे. आगामी निवडणूक विचारात घेता, निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार नागपूर शहरातील सध्याची प्रभाग रचना व एकूण लोकसंख्या व जातीनिहाय लोकसंख्येची आकडेवारी महापालिकेने पाठविली आहे.
निवडणूक आयोग लोकसंख्या व गुगल मॅपच्या आधारावर प्रभाग रचना करणार आहे. राज्यस्तरावर ही प्रक्रिया पार पाडली जाणार आहे. यात महापालिकेच्या निवडणूक विभागाची फारशी भूमिका राहणार नाही.
निवडणुकीसाठी सहा-सात महिन्यांचाच कालावधी शिल्लक आहे. परंतु अद्याप प्रभागाची रचना निश्चित झालेली नसल्याने नगरसेवक ांची चिंता वाढली आहे. नवीन प्रभागात नेमक्या कोणत्या वस्त्यांचा समावेश राहील. कार्यक्षेत्राबाहेरील भाग प्रभागाला जोडल्या गेल्यास विद्यमान नगरसेवकांना निवडणूक अवघड जाणार आहे. त्यामुळे प्रभाग रचनेची नगरसेवकांना उत्सुकता आहे.
चार सदस्यीय प्रभाग रचनेमुळे पक्ष व लहान पक्षाच्या नगरसेवकांची चिंता वाढली आहे. निवडणूक खर्चात वाढ होणार असल्याने सर्वसामान्य उमेदवारांपुढे संकट उभे ठाकणार आहे. अनेक नगरसेवक भाजप व काँग्रेसमध्ये जाण्याच्या तयारीत आहेत. प्रभाग रचना जाहीर होताच पक्षप्रवेशाचा हंगाम सुरू होण्याची शक्यता आहे. (प्रतिनिधी)

प्र्रभाग रचनेची उत्सुकता
२०१२ मध्ये दोन सदस्यीय प्रभाग पद्धतीने निवडणूक झाली होती. यात ७२ प्रभागातून १४५ उमेदवार निवडून आले होते. नवीन सभागृहात १५१ सदस्य राहणार आहेत. चार सदस्यीय प्रभाग पद्धत विचारात घेता ३८ प्रभाग राहतील. यातील शेवटचा प्रभाग तीन सदस्यांचा राहणार आहे. त्यामुळे कमी सदस्य असलेला शेवटचा प्रभाग नेमका कोणता राहील, याची उत्सुकता आहे.
आयोगाच्या निर्देशानुसार कार्यवाही
महापालिका निवडणुकीसाठी महापालिका प्रशासन सज्ज आहे. राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार लोकसंख्या व वॉर्ड रचनेची माहिती पाठविली आहे. परंतु निवडणुकीच्या पूर्वतयारीसंदर्भात आयोगाकडून अद्याप महापालिका प्रशासनाला निर्देश प्राप्त झालेले नाही. आयोगाच्या निर्देशानुसार कार्यवाही केली जाईल.
- प्रमोद भुसारी, अतिरिक्त उपायुक्त

Web Title: Municipal Ward Composition on NP

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.