दर्जेदार अग्निशमन सुरक्षा सेवा देण्यास मनपा कटिबद्ध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 14, 2023 08:34 PM2023-04-14T20:34:36+5:302023-04-14T20:35:03+5:30
Nagpur News नागपूर शहरातील प्रत्येक नागरिकास दर्जेदार अग्निशमन सुरक्षा सेवा प्रदान करण्यास नागपूर महानगरपालिका कटिबद्ध आहे, असे प्रतिपादन मनपा प्रशासक तथा आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी केले.
नागपूर : जीवाची पर्वा न करता शहर आणि शहरातील नागरिकांच्या सुरक्षेचे अहोरात्र कार्य अग्निशमन विभाग सातत्याने करत आले आहे. या कार्यात अनेकांना आपल्या प्राणाची बाजी देखील लावावी लागली आहे. शहर वाढत असताना विभागाची जबाबदारी सुद्धा वाढत आहे. नागपूर शहरातील प्रत्येक नागरिकास दर्जेदार अग्निशमन सुरक्षा सेवा प्रदान करण्यास नागपूर महानगरपालिका कटिबद्ध आहे, असे प्रतिपादन मनपा प्रशासक तथा आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी केले.
अग्निशमन व आणीबाणी सेवा विभागातर्फे अग्निशमन सेवा सप्ताहाच्या अनुषंगाने मनपा मुख्यालयात अग्निशमन सेवा दिवस कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले, यावेळी ते बोलत होते. प्रसंगी अतिरिक्त आयुक्त अजय गुल्हाणे, अतिरिक्त आयुक्त राम जोशी, मुख्य अभियंता राजीव गायकवाड, उपायुक्त रवींद्र भेलावे, उपायुक्त प्रकाश वराडे, उपमुख्य अग्निशमन अधिकारी बी.पी. चंदनखेडे उपस्थित होते. आयुक्तांनी अग्निशमन कार्य करताना प्राणाची आहुती देणाऱ्या शहीद जवानांना पुष्पचक्र अर्पण करून श्रद्धांजली वाहिली. अग्निशमन परेडचे निरीक्षण केले, तसेच अग्निशमन जवानांद्वारे देण्यात आलेली मानवंदना स्वीकारली. कार्यक्रमाचे संचालन मनीष सोनी यांनी केले. आभार उपमुख्य अग्निशमन अधिकारी बी.पी. चंदनखेडे यांनी मानले.
- शहीद जवानांच्या कुटुंबीयांचा सन्मान
अग्निशमन बचाव कार्य करीत असताना शहीद झालेल्या जवानांच्या कुटुंबीयांचा मनपातर्फे सन्मान करण्यात आला. शहीद गुलाब कावळे यांच्या पत्नी सरोजिनी गुलाब कावळे, शहीद प्रभू कुहिकर यांच्या पत्नी चंद्रकला प्रभू कुहिकर यांना मनपाच्या शिक्षण आणि आरोग्य विभागामध्ये अनुकंपा तत्वावर नोकरी देण्यात आली आहे. त्यांच्यासह शहीद रमेश ठाकरे यांचे पुत्र कपिल ठाकरे यांनादेखील मान्यवरांनी सन्मानित केले.