नागपूर विद्यापीठातील घोटाळ्याच्या चौकशीसाठी मुनिश्वर समिती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 21, 2018 12:43 AM2018-11-21T00:43:03+5:302018-11-21T00:43:49+5:30
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या शारीरिक शिक्षण विभागातर्फे करण्यात आलेल्या ब्लेझर, ट्रॅकसूट व कीटच्या खरेदीत घोटाळा झाला आहे. विद्यापीठाच्या खरेदी समितीच्या बैठकीत ही बाब सिद्ध झाली. या घोटाळ्याच्या चौकशीसाठी विधीसभा सदस्य विजय मुनिश्वर यांच्या अध्यक्षतेखाली तीन सदस्यीय समिती गठित करण्यात येणार आहे. बैठकीचे कार्यवृत्त कुलगुरूंना न मिळाल्यामुळे अद्याप समितीचे गठन झालेले नाही, अशी माहिती सूत्रांनी दिली.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या शारीरिक शिक्षण विभागातर्फे करण्यात आलेल्या ब्लेझर, ट्रॅकसूट व कीटच्या खरेदीत घोटाळा झाला आहे. विद्यापीठाच्या खरेदी समितीच्या बैठकीत ही बाब सिद्ध झाली. या घोटाळ्याच्या चौकशीसाठी विधीसभा सदस्य विजय मुनिश्वर यांच्या अध्यक्षतेखाली तीन सदस्यीय समिती गठित करण्यात येणार आहे. बैठकीचे कार्यवृत्त कुलगुरूंना न मिळाल्यामुळे अद्याप समितीचे गठन झालेले नाही, अशी माहिती सूत्रांनी दिली.
विभागाने विद्यापीठाच्या विविध चमूतील खेळाडूंसाठी ब्लेझर, ट्रॅकसूट व स्पोर्ट कीटची खरेदी केली होती. नियमानुसार तीन लाखापर्यंत खरेदीचा अधिकार विभागाला असतो. त्यापेक्षा अधिक रकमेची खरेदी करण्यासाठी निविदा काढणे आवश्यक आहे. निविदा मागविल्यानंतर सामानाच्या खरेदीसाठी कुलगुरुंची मंजुरी घेणे आवश्यक आहे. परंतु असे करण्यात आले नाही. निविदा काढण्यापूर्वीच सामान मागविण्यात आले. विना मंजुरी घेता एका व्यक्तीला कंत्राट देण्यात आले. सामानाचा पुरवठाही झाला आहे. बिलाला मंजुरी देण्यासाठी खरेदी समितीसमोर ठेवण्यात आले. यावर बैठकीत उपस्थित सदस्यांनी आक्षेप घेतला. या बाबीची गंभीर दखल घेऊन समितीने खरेदीला मंजुरी देण्यास नकार दिला. सोबतच विभागाच्या संचालक डॉ. कल्पना वसंत जाधव यांना स्पष्टीकरण मागितले होते.
या प्रकरणाचा निष्पक्ष तपास करण्यात येईल. जो दोषी असेल त्याच्या विरुद्ध कारवाई करण्यात येईल. सोबतच खरेदी रद्द करण्यात येईल, असे आश्वसन कुलगुरूंनी दिली होते. यासंदर्भात चौकशी समितीचे गठन झाले नसले तरी अध्यक्षांचे नाव निश्चित केले आहे. विजय मुनिश्वर हे खेळाशी जुळलेले आहेत. त्यामुळे त्यांना अध्यक्ष करण्यात आले आहे. सोबतच या समितीत शारीरिक शिक्षण विभागाचे माजी संचालक डॉ.धनंजय वेळूकर यांचादेखील समावेश असेल.