मुन्ना - मंगल यादव गटावर दंगलीचा गुन्हा, फटाक्यांसाठी फोडली डोकी, नातेवाईक बनले शत्रू
By ऑनलाइन लोकमत | Published: October 22, 2017 10:53 PM2017-10-22T22:53:36+5:302017-10-22T22:53:51+5:30
नागपूर - फटाके फोडण्याच्या क्षुल्लक कारणावरून वाद करून अजनीतील परस्परविरोधी मुन्ना यादव - मंगल यादव गटाने एकमेकांचे डोके फोडले. त्यांनी केलेल्या जबर हाणामारीत एकूण सात जण जखमी झाले. त्यातील दोघांची प्रकृती गंभीर आहे. दोन्ही गटाकडून तक्रारी नोंदविण्यात आल्यानंतर पोलिसांनी १० जणांवर दंगल तसेच प्राणघातक हल्ला चढवण्याच्या आरोपाखाली गुन्हा दाखल केला.
राज्य कामगार कल्याण महामंडळाचे अध्यक्ष ओमप्रकाश ऊर्फ मुन्ना यादव हे वर्धा मार्गावरील अजनी चौकाजवळच्या चुना भट्टी परिसरात राहतात. त्यांच्या जुन्या घराच्या बाजूलाच त्यांचे नातेवाईक असलेले मंगल यादव राहतात. ते एकमेकांचे नातेवाईक असले तरी त्यांच्यात अनेक दिवसांपासून पटत नाही. शनिवारी रात्री ९ ते ९.३० च्या दरम्यान दोन्ही कुटुंबीयांकड भाऊबीजेचा कार्यक्रम सुरू होता. त्यानिमित्ताने मुन्ना यांच्या करण आणि अर्जून नामक मुलांनी फटाके फोडायला सुरुवात केली. त्याला मंगल यादवच्या गटातील मुलांनी विरोध केला. त्यावरून बाचाबाची आणि आरडाओरड वाढली. पाहता पाहता मंगल यादवच्या गटातील मुलांनी करण आणि अर्जुनवर हल्ला चढवला. करण आणि अर्जुनच्या डोक्याला जबर दुखापत झाल्यानंतर मुन्ना यादव यांच्या गटातील मुलांनी मंगलच्या गटातील मुलांवर धाव घेतली. त्यानंतर जोरदार हाणामारी सुरू झाली. लाठ्या, रॉड, तलवारीचा सर्रास वापर झाल्यामुळे मुन्ना यांच्या गटातील करण, अर्जून आणि अन्य एक असे तिघे जबर जखमी झाले. तर, मंगल यादवच्या गटातील पापा यादव, करण आणि सागर यादव हे जबर जखमी झाले. हाणामारीच्या या घटनेत मध्यस्थी करायला गेलेल्या नगरसेविका लक्ष्मी यादव यांनाही दुखापत झाली. त्यानंतर घटनास्थळ परिसरात प्रचंड तणाव निर्मांण झाला. माहिती कळताच मोठा पोलीस ताफा पोहचला. दुसरीकडे दोन्ही गटातील मंडळींनी धंतोली ठाण्यात धाव घेतली. तेथेही ते एकमेकांवर आरोप - प्रत्यारोप करीत होते. मंगल यादव गटातर्फे पापा यादवने नोंदविलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी मुन्ना यादव, बाला यादव, लक्ष्मी यादव, करण आणि अर्जून यादव या पाच जणांवर गुन्हे गैरकायद्याची मंडळी जमवून प्राणघातक हल्ला करणे, शस्त्र वापरणे, आदी आरोपाखाली विविध कलमानुसार गुन्हा दाखल केला. तर, नगरसेविका तारा ओमप्रकाश यादव यांच्या तक्रारीवरून मंगल यादव, पापा यादव, गब्बर यादव, सागर आणि मंजू यादव यांच्याविरुद्ध विविध कलमानुसार गुन्हा दाखल केला.
नेहमीचाच वाद
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुन्ना यादव यांच्या दोन्ही मुलांना डोक्याला जबर दुखापत असल्यामुळे त्यांना धंतोलीच्या एका खासगी ईस्पितळात दाखल करण्यात आले असून, विरोधी गटातील पापा आणि मंजू यादव यांच्यावर मेडिकलमध्ये उपचार सुरू असल्याचे समजते. दरम्यान, या दोन्ही गटात यापूर्वीही अनेकदा वाद आणि हाणामा-या झाल्या आहेत. हे वाद पोलीस ठाण्यातही पोहचले आहेत. मात्र, यावेळीची हाणामारी गंभीर आहे. विशेष म्हणजे, एका गटातील आरोपी मंगल यादव याला दोन कोटींच्या लुटमार प्रकरणी कोर्टाने काही दिवसांपूर्वीच कारावासाची शिक्षा सुनावली आहे. नुकताच तो कारागृहातून बाहेर आला असून, आता पुन्हा त्याच्यावर हा गुन्हा दाखल झाला आहे.