मुरली मनोहर जोशींनी घेतली सरसंघचालकांची भेट
By admin | Published: March 3, 2016 03:06 AM2016-03-03T03:06:26+5:302016-03-03T03:06:26+5:30
भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते डॉ. मुरली मनोहर जोशी यांनी बुधवारी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांची संघ मुख्यालयात भेट घेतली.
नागपूर : भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते डॉ. मुरली मनोहर जोशी यांनी बुधवारी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांची संघ मुख्यालयात भेट घेतली. यावेळी त्यांनी देशातील वर्तमान राजकारण, विविध मुद्यांवरून होत असलेले वाद त्याचप्रमाणे पक्षाच्या अंतर्गत स्थितीवर सरसंघचालकांशी चर्चा केली, अशी माहिती सूत्रांनी दिली. यावेळी त्यांनी संघाच्या ज्येष्ठ प्रचारक तसेच पदाधिकाऱ्यांची भेट घेतली.
डॉ. जोशी मंगळवारी रात्रीच उपराजधानीत पोहोचले होते. सकाळी १० च्या सुमारास डॉ. जोशी महाल येथील संघ मुख्यालयात पोहोचले. यावेळी त्यांच्यासोबत सुरक्षारक्षक होते. सरसंघचालकांशी सुमारे तासभर त्यांनी बंदद्वार चर्चा केली. डॉ. जोशी अडीच तास मुख्यालयात होते व १.४५ च्या सुमारास ते तेथून निघाले. नागपुरात त्यांचा मुक्काम एका स्थानिक हॉटेलमध्ये होता.
बिहार निवडणुकांमध्ये झालेल्या पराभवानंतर पक्षनेतृत्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित करणारे भाजपचे ज्येष्ठ नेते खा. डॉ. मुरली मनोहर जोशी यांनी बऱ्याच काळापासून मौन साधले आहे. भाजपाच्या मार्गदर्शक मंडळाचे ते सदस्य असले तरी पक्षीय राजकारणाच्या मुख्य प्रवाहातून काहीसे बाजूला झाले आहे. राजकीय विषयांवर भाष्य करण्याचे ते टाळत आहेत. परंतु संघवर्तुळात मात्र त्यांना मानणारा मोठा वर्ग आहे. मागील वर्षी नोव्हेंबर महिन्यात त्यांनी संघाच्या वरिष्ठ स्वयंसेवकांसाठी विशेष प्रशिक्षण शिबिराला देशभरातून आलेल्या स्वयंसेवकांना मार्गदर्शन केले होते. सध्याची एकूण राजकीय पार्श्वभूमी, भविष्यात महत्त्वाच्या राज्यातील निवडणुका लक्षात घेता सरसंघचालकांशी त्यांची झालेली बैठक महत्त्वपूर्ण मानण्यात येत आहे. (प्रतिनिधी)