मुरली मनोहर जोशींनी घेतली सरसंघचालकांची भेट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 31, 2018 09:04 PM2018-01-31T21:04:46+5:302018-01-31T21:08:09+5:30
भारतीय जनता पक्षाचे जेष्ठ नेते डॉ.मुरली मनोहर जोशी यांनी बुधवारी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ.मोहन भागवत यांची संघ मुख्यालयात भेट घेतली.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : भारतीय जनता पक्षाचे जेष्ठ नेते डॉ.मुरली मनोहर जोशी यांनी बुधवारी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ.मोहन भागवत यांची संघ मुख्यालयात भेट घेतली. भाजप नेतृत्वावर नाराज असलेल्या यशवंत सिन्हा व शत्रुघ्न सिन्हा यांनी ‘राष्ट्रमंच’ या व्यासपीठाची स्थापना केली असून या माध्यमातून केंद्रावर घणाघाती टीकादेखील केली. या पार्श्वभूमीवर भाजपचे जुनेजाणते नेते असलेल्या मुरली मनोहर जोशी यांची ही भेट महत्त्वाची मानण्यात येत आहे.
मुरली मनोहर जोशी यांची ही भेट गुप्त ठेवण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. सकाळी ११ वाजताच्या सुमारास जोशी संघ मुख्यालयात दाखल झाले. त्यानंतर त्यांनी सरसंघचालकांची भेट घेतली. यावेळी इतरही कुणी पदाधिकारी होते का हे कळू शकले नाही. सुमारे दोन तास जोशी मुख्यालयात होते. त्यानंतर ते शहरातील एका तारांकित हॉटेलकडे रवाना झाले. यावेळी जोशी यांनी प्रसारमाध्यमांशी बोलण्याचे टाळले. तसेच संघाच्या पदाधिकाऱ्यांनीदेखील प्रतिक्रिया देण्यास नकार दिला.