खुनाच्या आरोपीचा लॉकअपमध्ये आत्महत्येचा प्रयत्न, पोलीस ठाण्यात खळबळ

By योगेश पांडे | Published: November 1, 2023 04:50 PM2023-11-01T16:50:27+5:302023-11-01T16:51:19+5:30

तहसील पोलीस ठाण्यातील घटना : शौचालयातील टाईल्स काढून जीव देण्याचा प्रयत्न

Murder accused commits suicide in lockup, Incident in Tehsil Police Station | खुनाच्या आरोपीचा लॉकअपमध्ये आत्महत्येचा प्रयत्न, पोलीस ठाण्यात खळबळ

खुनाच्या आरोपीचा लॉकअपमध्ये आत्महत्येचा प्रयत्न, पोलीस ठाण्यात खळबळ

नागपूर : मोमीनपुरा येथील गेस्टहाऊस मालकाच्या खुनाच्या प्रकरणातील आरोपींपैकी एकाने चक्क पोलीस लॉकअपमध्येच आत्महत्येचा प्रयत्न केला. पोलीस कर्मचाऱ्यांचे वेळीच लक्ष गेल्याने त्याला वेळीच बाहेर काढून उपचारासाठी पाठविण्यात आले. शौचालयातील टाईल्स काढून आरोपीने हा प्रकार केला. या एकूण प्रकारामुळे तहसील पोलीस ठाण्यात खळबळ उडाली होती व वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनीदेखील पोलीस ठाण्याला भेट दिली.

सलमान खान उर्फ समशेर खान (२७, हसनबाग) असे आरोपीचे नाव आहे. २४ ऑक्टोबर रोजी मालमत्तेच्या वादातून मोहम्मद सोहेल उर्फ परवेझ मो.हारून याने सलमान खान उर्फ समशेर खान आणि आशिष बिसेन यांच्या मदतीने जमील अहमद यांची गेस्ट हाउसमध्ये जाऊन हत्या केली होती. या हत्येमुळे खळबळ उडाली होती व आरोपी फरार झाले होते. पोलिसांनी परवेजसह तिघांनाही अटक केली होती. तीनही आरोपींना पोलीस कोठडी सुनावण्यात आली व त्यांची चौकशी सुरू होती.

मंगळवारी सायंकाळच्या सुमारास लॉकअपमधून काहीतरी आपटल्याचा आवाज आला. तेथील तैनात पोलीस कर्मचारी लॉकअपजवळ पोहोचले. त्यावेळी सलमान लॉकअपच्या दाराजवळ बसला होता व त्याचे डोके रक्तबंबाळ झाले होते. हादरलेल्या कर्मचाऱ्यांनी तत्काळ वरिष्ठांना या प्रकाराची कल्पना दिली. पोलीस निरीक्षक संदीप बुआ व इतर जण तातडीने तेथे पोहोचले. सलमानला लगेच मेयो इस्पितळात उपचारांसाठी रवाना करण्यात आले. पोलिसांनी तेथे पाहणी केली असता टाईल्सचे तुकडे दिसून आले. सलमानने लॉकअपच्या शौचालयातील टाईल्स तोडून आत आणली होती. त्या टाईल्सने त्याने स्वत:वर वार केले होते. मात्र टाईल्स तोडताना आवाज झाला व त्याचा प्रयत्न फसला. या प्रकरणात त्याच्याविरोधात आणखी एका गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.

Web Title: Murder accused commits suicide in lockup, Incident in Tehsil Police Station

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.