सफेलकरकडून आणखी एकाची हत्या : विशाल पैसाडेलीचा अपघात नव्हे, हत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 9, 2021 11:55 PM2021-04-09T23:55:38+5:302021-04-09T23:58:11+5:30
Murder of another by Safelkar, crime news मार्च २००७ मध्ये विशाल पैसाडेली (वय ३२) नामक गुन्हेगाराचा अपघात झाला होता. तो अपघात नसून त्याची अनैतिक संबंधाच्या संशयातून हत्या करण्यात आली होती, अशी खळबळजनक माहिती पोलिसांना मिळाली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : मार्च २००७ मध्ये विशाल पैसाडेली (वय ३२) नामक गुन्हेगाराचा अपघात झाला होता. तो अपघात नसून त्याची अनैतिक संबंधाच्या संशयातून हत्या करण्यात आली होती, अशी खळबळजनक माहिती पोलिसांना मिळाली आहे. या हत्याकांडाच्या कटकारस्थानात दुसरा एक गँगस्टर राजू भद्रे याचाही सहभाग असल्याचे स्पष्ट झाल्याचा दावा सूत्रांनी केला आहे.
२२ मार्च २००७ मध्ये विशाल पैसाडेली (रा. कमसरी बाजार, कामठी) याचा मौदा वाळेगाव शिवारात अपघातात मृत्यू झाला होता. या प्रकरणी खापरखेडा पोलिस ठाण्यात अपघाताचा गुन्हा दाखल झाला होता. अपघातातील आरोपी कारचालक गौरव झाडे याला अटक करण्यात आली होती. त्याने कारचे ब्रेक फेल झाल्याने अपघात झाल्याची कबुली दिली होती. मात्र हा अपघात नसून रणजित सफेलकर आणि राजू भद्रे यांनी घडवून आणलेली हत्या असल्याचे आता १३ वर्षांनंतर उघड झाले आहे.
पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, विशालची रणजित सफेलकरच्या नात्यातील एका महिलेशी मैत्री होती. ती माहीत झाल्यामुळे रणजित कमालीचा खवळला होता. विशालला रणजितच्या पापाची इत्थंभूत माहिती होती. त्यामुळे त्याची हत्या केल्याचे उघड झाल्यास बरेच गुन्हे उघड होण्याची भीती होती. त्यामुळे रणजितने विशालचा काटा काढण्यासाठी मोठे कटकारस्थान रचले. त्यात आरोपी संजय भद्रे, श्रीकांत ऊर्फ भैया सांभारे, हेमंत गोरखा आणि तुषार दलाल यांना सहभागी करून घेतले. ठरल्याप्रमाणे रणजितने विशालला एका कामाच्या निमित्ताने खापरखेड्याकडे पाठविले. त्याचा पाठलाग करून आरोपींनी राजू भद्रेच्या स्कॉर्पिओने विशालला चिरडले आणि तो अपघातात मृत झाल्याचा कांगावा केला. दरम्यान, तत्कालीन पोलिसांनी या अपघाताची बारकाईने चाैकशी केली असता सफेलकर, भद्रेच्या सांगण्यावरून गाैरव झाडेने या अपघाताचा आरोप स्वीकारून सरेंडर केले होते. बदल्यात सफेलकरने गौरवला ५० हजार रुपये दिले आणि जामीन तसेच कोर्टकचेरीसाठी येणारा खर्च केला. या प्रकरणातून आरोपी गौरव झाडेची निर्दोष सुटका झाली, हे विशेष.
आता भद्रेचाही नंबर
आर्किटेक्ट निमगडे आणि मनीष श्रीवास हत्याकांडात कुख्यात सफेलकर तसेच कालू आणि भरत हाटेची पोलिसांनी खास खातरदारी केली. त्यादरम्यान विचारपूस केल्यानंतर विशालच्या हत्याकांडाची माहिती पुढे आल्याचे समजते. यात सफेलकरला कुख्यात भद्रेने मदत केल्याचे स्पष्ट झाल्याने आता भद्रेही पुन्हा एकदा अडचणीत आला आहे. सध्या तो पिंटू शिर्के हत्याकांडात आजन्म कारावासाची शिक्षा भोगत आहे. भद्रेचे अनेक गुन्हे असेच पचले आहेत. पोलीस आयुक्त अमितेशकुमार आणि गुन्हे शाखेचे उपायुक्त गजान शिवलिंग राजमाने यांच्या चाैकशीला तो पहिल्यांदाच सामोरे जाणार असून, त्यामुळे त्याच्याही टोळीत खळबळ निर्माण झाली आहे. दरम्यान, या हत्याकांडाच्या प्रकरणाची नव्याने चाैकशी (केस रिओपन) करण्यासाठी पोलीस कायदेविषयक सल्ला घेत असून न्यायालयीन परवानगीसाठी लवकरच अर्ज केला जाणार असल्याची माहिती मिळाली आहे.