आईला मारहाण केल्याने भावाचा खून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 24, 2021 09:34 PM2021-07-24T21:34:00+5:302021-07-24T21:34:30+5:30
Murder of brother , crime news दारू पिऊन आईला शिवीगाळ करीत मारहाण करणाऱ्या धाकट्या भावास मध्यस्थी करताना धक्का दिला. ताे सिमेंट राेडवर काेसळल्याने त्याच्या डाेक्याला गंभीर दुखापत झाली आणि त्यातच त्याचा मृत्यू झाला.
लाेकमत न्यूज नेटवर्क
कामठी : दारू पिऊन आईला शिवीगाळ करीत मारहाण करणाऱ्या धाकट्या भावास मध्यस्थी करताना धक्का दिला. ताे सिमेंट राेडवर काेसळल्याने त्याच्या डाेक्याला गंभीर दुखापत झाली आणि त्यातच त्याचा मृत्यू झाला. पुरावे नष्ट करण्याच्या उद्देशाने थाेरल्या भावाने मावस भावाच्या मदतीने मृतदेह घाेरपड-शिरपूर मार्गालगतच्या शेतातील विहिरीत टाकला. ही घटना शुक्रवारी (दि. २३) सकाळी उघडकीस आली असून, पाेलिसांनी दाेघांना अटक केली आहे.
रवी गणपत कडू (३५) असे मृताचे तर सुरेश गणपत कडू (४०) व रोहित नरेश मुळे (२४) अशी अटक करण्यात आलेल्या आराेपींची नावे आहेत. हे तिघेही घाेरपड, ता. कामठी येथील रहिवासी आहेत. रवीला दारूचे व्यसन हाेते. दारू प्यायल्यानंतर ताेइतरांसह आईला शिवीगाळ व प्रसंगी मारहाणही करायचा. रवी शनिवारी (दि. १७) सायंकाळी दारू पिऊन घरी आला हाेता. त्याने आईला शिवीगाळ करीत मारहाण करायला सुरुवात केली. त्यामुळे सुरेशने त्याला समजावत शांत करण्याचा प्रयत्न केला. या धावपळीत त्याचा रवीला धक्का लागला आणि ता. सिमेंट राेडवर काेसळला. त्यामुळे त्याच्या डाेक्याला गंभीर दुखापत झाली.
ताे जखमी अवस्थेत बराच वेळ घटनास्थळीच पडून राहिला. रात्री ९ वाजताच्या सुमारास त्याचा मृत्यू झाल्याचे सुरेशच्या लक्षात आले. त्याने पाेलिसांना सूचना देण्याऐवजी मावसभाऊ राेहितला साेबत घेऊन रवीच्या मृतदेहाची परस्पर विल्हेवाट लावली. मात्र, शुक्रवारी (दि. २३) सकाळी हा प्रकार उघडकीस आला. रवीचा खून झाल्याचे प्रथमदर्शनी स्पष्ट हाेताच पाेलिसांनी सुरेश व राेहितला विश्वासात घेत विचारपूस केली. दाेघांनीही संपूर्ण घटनाक्रम सांगत गुन्ह्याची कबुली दिल्याने त्यांना अटक केली. याप्रकरणी कामठी (जुनी) पाेलिसांनी भादंवि ३०२, ३४ अन्वये गुन्हा नाेंदविला असून, या घटनेचा तपास दुय्यम पोलीस निरीक्षक मंगेश काळे करीत आहेत.
मृतदेह शेतातील विहिरीत टाकला
घटनेच्या रात्री १० वाजताच्या सुमारास सुरेशने मृत रवीला त्याच्या माेटरसायकलवर बसविले. राेहितला साेबत घेऊन मृतदेह घाेरपड-शिरपूर मार्गालगतच्या प्रेमचंद शंकर खाेत, रा. घाेरपड, ता. कामठी यांच्या शेतात नेला. तिथे दाेघांनीही मृतदेहाला दाेरीने दगड बांधले व मृतदेह शेतातील विहिरीत टाकला व घरी परत आले. शुक्रवारी (दि. २३) सकाळी मृतदेह विहिरीत तरंगताना आढळून आला. रवीचा खून झाल्याचे प्राथमिक वैद्यकीय अहवालात स्पष्ट झाल्याने पाेलिसांनी तपासाची दिशा बदलविली आणि सुरेश व राेहितला चाैकशीसाठी ताब्यात घेतले.