नागपुरात लग्नास विरोध करणाऱ्या भावाची हत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 25, 2019 10:19 AM2019-02-25T10:19:28+5:302019-02-25T10:21:40+5:30
विवाहितेसोबत लग्न करण्याचे मनसुबे पूर्ण होत नसल्याचे पाहून एका गुंडाने राहुल शंकर तुरकेल (वय ३०, रा. भोलेबाबानगर) या तरुणाची हातोड्याने ठेचून हत्या केल्याची घटना येथे घडली.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर: विवाहितेसोबत लग्न करण्याचे मनसुबे पूर्ण होत नसल्याचे पाहून एका गुंडाने राहुल शंकर तुरकेल (वय ३०, रा. भोलेबाबानगर) या तरुणाची हातोड्याने ठेचून हत्या केल्याची घटना येथे घडली. हत्या केल्यानंतर आरोपीने रक्ताच्या थारोळ््यातील मृतदेह असलेल्या खोलीला कुलूप लावून पळ काढला. नंदनवन पोलीस ठाण्याच्या हद्दीतील खरबी, गाडगेनगरात रविवारी दुपारी ही घटना घडली. रितेश दीपक सिकलवार (वय २५, रा. गाडगेबाबानगर) असे आरोपीचे नाव असून त्याला पोलिसांनी अटक केली आहे.
आरोपी रितेश आणि मृतराहुल नातेवाईक होत. रितेश राहुलच्या विवाहित चुलत बहिणीवर एकतर्फी प्रेम करतो. त्याने वर्षभरापूर्वी तिच्यासोबत लग्न करण्याची इच्छा व्यक्त केली होती. मात्र, त्याची गुन्हेगारी वृत्ती लक्षात घेत नातेवाईकांनी त्याला नकार दिला. त्यानंतर त्या तरुणीचे दुसºया तरुणासोबत लग्न लावून दिले. तरी रितेश विवाहितेसोबत वारंवार लग्न करण्याचा तगादा लावत होता. याच कारणावरून आठवडाभरापूर्वी त्याचा राहुलसोबत वाद झाला होता. वारंवार समजूत काढूनही तो ऐकायला तयार नसल्याने विवाहितेच्या कुटुंबात कलह वाढू शकतो, हे ध्यानात घेऊन गेल्या आठवड्यात राहुलने रितेशचे कान शेकले होते. मात्र, रितेशवर त्याचा फरक पडला नाही. तीन दिवसांपूर्वी रितेश राहुलच्या विवाहित बहिणीच्या घरी गेला आणि त्याने तिच्यासोबत लग्न करण्याचा हट्ट धरला. यावेळी राहुलच्या बहिणीनेही त्याची समजूत काढून हे शक्य नसल्याचे सांगत त्याला परत पाठविले.
जिच्यावर प्रेम आहे, तिच्यासोबत लग्न करण्यात सर्वात मोठा अडथळा राहुल असल्याची भावना झाल्याने त्यालाच मार्गातून हटविण्याचा कट रचला. रविवारी दुपारी रितेशने राहुलला शोधले. आपण पार्टी करू, असे म्हणत त्याला स्वत:च्या घरी नेले. तेथे दोघे यथेच्छ दारू पिले. जेवण करताना आरोपी रितेशने पुन्हा राहुलच्या बहिणीसोबत लग्नाचा विषय काढला. राहुलने नकार देताच तयारीत असलेल्या रितेशने त्याच्या जवळचा हातोडा काढला अन् डोक्यावर एकापाठोपाठ एक फटके मारले. राहुल रक्ताच्या थारोळ्यात कोसळला. तो ठार झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्याचा मृतदेह तसाच ठेवून आरोपीने त्या खोलीला कुलूप लावले अन् बाहेर पळून गेला. आरोपी रितेशचे आई-वडील सायंकाळी घरी परतले तेव्हा हा प्रकार उघड झाला. त्यानंतर नंदनवन पोलिसांना कळविण्यात आले. त्यानुसार, नंदनवनचा ताफा आणि पोलीस उपायुक्त राजतिलक रोशन आपल्या ताफ्यासह घटनास्थळी पोहचले. त्यांनी लगेच आरोपीची शोधाशोध करून रितेशला अटक केली.
आईचा आधार गेला
राहुलला वडील नाहीत. त्याच्या वडिलांचा मृत्यू झाल्यानंतर त्याला अनुकंपा तत्त्वावर नोकरी मिळाली होती. राहुलने दोन बहिणींचे लग्न करून त्यांचे कुटुंब बसवले होते तर, आता तो विधवा आईचा एकमात्र आधार होता. त्याची हत्या झाल्याने त्याच्या आईला जबर मानसिक धक्का बसला आहे.