नागपूरच्या नरसाळ्यातील हत्या उधारीच्या वादातून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 19, 2018 10:42 PM2018-05-19T22:42:57+5:302018-05-19T22:43:07+5:30
उमरेड मार्गावरील नरसाळ्याच्या सुदामनगरीत एका तरुणाची दगडाने ठेचून निर्घृण हत्या करण्यात आली. विशाल ऊर्फ प्रदीप दिलीप मानकर (वय २१) असे मृताचे नाव आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : उमरेड मार्गावरील नरसाळ्याच्या सुदामनगरीत एका तरुणाची दगडाने ठेचून निर्घृण हत्या करण्यात आली. विशाल ऊर्फ प्रदीप दिलीप मानकर (वय २१) असे मृताचे नाव आहे. तो तुळजाईनगर, गारगोटी परिसरात राहत होता.
शनिवारी सकाळी विशाल मानकरचा मृतदेह नरसाळा परिसरात रक्ताच्या थारोळ्यात पडून दिसल्याने बघ्यांची मोठी गर्दी जमली. काहींनी सकाळी ७ वाजता ही माहिती हुडकेश्वर पोलिसांना कळवली. पोलिसांनी लगेच घटनास्थळ गाठले. विशालच्या मृतदेहाशेजारी दगड आणि दारूची बाटली पडून होती. त्याच्या खिशात असलेल्या व्हिजिटिंग कार्डवरून त्याचे नाव व पत्ता स्पष्ट झाला. त्यानंतर पोलिसांनी त्याचा मोठा भाऊ संदीप (वय २३) याला बोलवून घेतले. त्याच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार, विशालच्या मित्रांपैकी रोहित ऊर्फ छोट्या हरीश शाहू (वय २३, रा. सुदामनगर, दिघोरी) याला पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले. त्याच्यावर प्रश्नांची सरबत्ती करताच त्याने विशालच्या खुनाची कबुली दिली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विशाल कॅटरर्सचे काम करायचा. फावल्या वेळेत तो जुने फर्निचर विकत घेणे आणि ते चांगले करून विकण्याचे काम करायचा. आरोपी शाहूसोबत त्याची मैत्री होती. शाहू सेंट्रिंगचे काम करतो. विशालने दीड वर्षापूर्वी शाहूकडून ४० हजार रुपये उधार घेतले होते. ते परत करण्यासाठी तो टाळाटाळ करीत होता.
नकार आणि धमकी भोवली
शुक्रवारी रात्री १० च्या सुमारास हे दोघे गारगोटी परिसरातील नाल्याजवळच्या मैदानात दारू पीत बसले. शाहूने पैशाचा विषय काढताच विशालने त्याला पैसे देण्यास नकार दिला. तुला जे करायचे ते कर, असे म्हणत शिवीगाळ करून धमकीही दिली. त्यामुळे संतापलेल्या शाहूने बाजूचा दगड उचलून विशालचे डोके ठेचले. विशाल ठार झाल्याचे लक्षात आल्यानंतर आरोपी पळून गेला. आरोपीने हा घटनाक्रम सांगितल्यानंतर पोलिसांनी त्याला अटक केली. अतिरिक्त पोलीस आयुक्त श्यामराव दिघावकर, उपायुक्त नीलेश भरणे यांच्या मार्गदर्शनाखाली एसीपी किशोर सुपारे, हुडकेश्वरचे ठाणेदार सत्यवान माने, द्वितीय निरीक्षक किशोर चौधरी, अरविंद भोळे, पीएसआय भावेश कावरे, सचिन धर्मोजवार, हवालदार यादव, नायक नीलेश आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी ही कामगिरी बजावली.