तीन महिन्यानंतर हत्या प्रकरणाचा छडा : तीन आरोपी गजाआड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 8, 2020 12:43 AM2020-09-08T00:43:44+5:302020-09-08T00:44:50+5:30
इतवारी रेल्वेस्थानकाजवळ १ जून रोजी धीरज ऊर्फ भोला भगवानदास साळवे या तरुणाच्या झालेल्या हत्येचा छडा लावण्यात लकडगंज पोलिसांनी तीन महिन्यांनंतर यश मिळवले. याप्रकरणी कुही जवळच्या वरंभा येथील तीन आरोपींना पोलिसांनी अटक केली.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : इतवारी रेल्वेस्थानकाजवळ १ जून रोजी धीरज ऊर्फ भोला भगवानदास साळवे या तरुणाच्या झालेल्या हत्येचा छडा लावण्यात लकडगंज पोलिसांनी तीन महिन्यांनंतर यश मिळवले. याप्रकरणी कुही जवळच्या वरंभा येथील तीन आरोपींना पोलिसांनी अटक केली. रामकृष्ण ऊर्फ रामा सुदाम मेश्राम (३६), हर्षल देवराव मेश्राम (२०) आणि शुभम नामदेव भगत (२३) अशी आरोपींची नावे आहेत. हे तिघेही कुही तालुक्यातील वरंभा गावचे रहिवासी आहेत. मृत धीरज उर्फ भोला साळवे हासुद्धा वरंबा गावचा रहिवासी होता. काही महिन्यांपूर्वी तो पत्नीसह नागपुरात राहायला आला होता. तो वाहनचालक होता. आरोपी रामा मेश्रामसोबत एका महिलेशी असलेल्या अनैतिक संबंधातून साळवेसोबत त्याचे वैमनस्य होते. या वादातून त्यांच्यात हाणामारी आणि पोलिस ठाण्यात तक्रारीही झाल्या होत्या. धीरजने रामा मेश्रामला घटनेच्या काही दिवसांपूर्वी बेदम मारहाण केली होती. त्यामुळे त्याचा काटा काढण्यासाठी आरोपी रामा मेश्रामने त्याचा चुलत भाऊ हर्षल मेश्राम तसेच त्याचा मित्र शुभम भगत या दोघांना सोबत घेतले. त्यांनी धीरजच्या हत्येचा कट रचला आणि त्याला इतवारी रेल्वे परिसरातील मालधक्का भागात नेले. तेथे मारहाण करून दुपट्ट्याने गळा आवळून त्याची हत्या केली आणि पळून गेले होते.
तांत्रिक बाबीचा आधार
या प्रकरणात पोलिसांकडे ठोस पुरावे नव्हते. मात्र तांत्रिक बाबीच्या आधारे या गुन्'ाचा छडा लावून परिमंडळ तीनचे उपायुक्त राहुल माकणीकर यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणेदार नरेंद्र हिवरे, पोलीस निरीक्षक राजेंद्रकुमार सानप यांच्या नेतृत्वात उपनिरीक्षक एस. व्ही. राऊत आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी उपरोक्त आरोपींना अटक केली.