नागपुरात तडीपार गुंडाने केली हत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 23, 2020 07:06 PM2020-06-23T19:06:02+5:302020-06-23T19:06:29+5:30
सक्करदऱ्यातील कुख्यात आणि तडीपार गुंड कार्तिक उमेश चौबे (वय २४) याने त्याच्या साथीदारांच्या मदतीने सोमवारी परिसरात राहणाऱ्या गौरव विनोद खडतकर (वय २८) या तरुणाची निर्घृण हत्या केली.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : सक्करदऱ्यातील कुख्यात आणि तडीपार गुंड कार्तिक उमेश चौबे (वय २४) याने त्याच्या साथीदारांच्या मदतीने सोमवारी परिसरात राहणाऱ्या गौरव विनोद खडतकर (वय २८) या तरुणाची निर्घृण हत्या केली. सोमवारी रात्री घडलेल्या या घटनेनंतर परिसरात प्रचंड तणाव निर्माण झाला. संतप्त जमावाने मुख्य आरोपी कार्तिक उमेश चौबे यांच्या घरावर हल्ला चढवून घर पेटवून देण्याचा प्रयत्न केला. मात्र वेळीच मोठा पोलीस ताफा तेथे पोहोचला. त्यामुळे आरोपीचे घर वाचले.
गौरव खडतकर हा सोमवारी क्वॉर्टर परिसरात राहत होता. गौरव काही वर्षांपूर्वी गुन्हेगारीत सक्रिय होता. मात्र त्याने अलीकडे गुन्हेगारी सोडली होती. या भागात त्याचा चांगला प्रभाव होता. त्यामुळे कुख्यात कार्तिक याला तो अडसर वाटत होता. कार्तिक चौबेविरुद्ध अनेक गंभीर गुन्हे दाखल असून त्याला तडीपारही करण्यात आले होते. मात्र पोलिसांची नजर चुकवून तो नागपुरातच राहत होता आणि गुन्हेगारीतही सक्रिय होता.
सोमवारी मध्यरात्री आरोपी कार्तिक चौबे, शहबाज उर्फ बाबू मुस्तफा खान, राजा उर्फ साहिल शेख बाबा, मृणाल गिरीश भापकर यांनी गौरवला गाठले. सर्व आरोपी दारूच्या नशेत चूर होते. त्यांनी गौरवला शाहू गार्डनच्या प्रवेशद्वाराजवळ नेले. तेथे त्याच्याशी वाद घालून रोफ्टर, दगड, फरची आणि लोखंडी हँडलने गौरववर हल्ला चढवला. त्याला ठार मारल्यानंतर आरोपी परिसरात दहशत पसरवू लागले. ते पाहून जमाव संतप्त झाला. त्यांनी आरोपींवर धाव घेतली. आरोपी कार्तिकच्या घरावर हल्ला करून जमावाने तोडफोड केली. जमाव त्याचे घरही पेटवून देण्याच्या तयारीत होता. मात्र त्याच वेळी सक्करदरा पोलिसांचा ताफा तेथे पोहोचला आणि त्यांनी जमावाला आवरले. या हत्याकांडानंतर सक्करदरा परिसरात प्रचंड तणाव निर्माण झाला. पोलिसांनी चारही आरोपींना अटक केली.