वादग्रस्त महिला वकिलाची हत्या,अल्पवयीन आरोपी सुधारगृहात

By admin | Published: April 16, 2017 01:51 PM2017-04-16T13:51:46+5:302017-04-16T13:51:46+5:30

गिट्टीखदानमधील वादग्रस्त महिला वकील राजश्री ऊर्फ राजेशकुमारी सतीशकुमार सोलोमन ऊर्फ टंडन (वय ५३) हिची हत्या करणा-या आरोपीला

Murder of controversial woman lawyer, minor accused reformer | वादग्रस्त महिला वकिलाची हत्या,अल्पवयीन आरोपी सुधारगृहात

वादग्रस्त महिला वकिलाची हत्या,अल्पवयीन आरोपी सुधारगृहात

Next
>ऑनलाइन लोकमत
नागपूर, दि. 16 - गिट्टीखदानमधील वादग्रस्त महिला वकील राजश्री ऊर्फ राजेशकुमारी सतीशकुमार सोलोमन ऊर्फ टंडन (वय ५३) हिची हत्या करणा-या आरोपीला पोलिसांनी शनिवारी सुधारगृहात पाठविले. दुसरीकडे त्याला मुक्त करावे, अशी जोरदार मागणी या भागातील नागरिकांनी घटनेच्या रात्रीपासून चालवली असून, त्यासाठी मोठा जमाव शुक्रवारी रात्री गिट्टीखदान ठाण्यासमोर जमला होता. 
 पशुवैद्यकीय महाविद्यालयाजवळच्या चौधरी ले-आऊटमध्ये राजश्री राहात होती. वकिलीची सनद घेतानाच तिने पीएचडीही केली होती. अस्खलित इंग्रजी बोलणारी राजश्री स्वभावाने मात्र फारच तापट होती. तिचे आजूबाजूला राहणाºयांसोबत फारसे पटत नव्हते. ज्याच्यासोबत पटत नाही, ती त्याच्याविरुद्ध वेगवेगळे कारस्थान करायची. आपल्या प्रभावाचा गैरवापर करून घेत तिने अनेकांना पोलिसांच्या कारवाईत अडकवले होते. तिच्या बाजूला चौधरी परिवार रााहतो. त्यांच्याशी पटत नसल्यामुळे तिने खोट्यानाट्या तक्रारी करून या कुटुंबातील कर्त्या व्यक्तीवर दोन वर्षांपूर्वी हद्दपारीची कारवाई करून घेतली होती. त्यानंतरही ती या परिवारातील सदस्यांना त्रास देत होती. शुक्रवारी रात्री ७ च्या सुमारास असाच प्रकार घडला. ती फोटो स्टुडिओकडे जात असताना आरोपी समोरून येत असल्याचे पाहून तिने त्याला टोमणा मारला. त्यावरून वाद वाढल्यानंतर राजश्रीने आरोपीच्या जोरदार कानशिलात लगावली. त्याला शिवीगाळ करून धमकीही दिली. त्यामुळे संतप्त झालेल्या आरोपीने घरातून चाकू आणला आणि राजश्रीचा पाठलाग करून तिच्यावर सपासप घाव घातले. जीव वाचविण्यासाठी ती बाजूच्या स्टुडिओकडे पळाली असता आरोपीने पाठलाग करून तिला गाठले आणि तब्बल १२ ते १४ घाव घालून तिला रक्ताच्या थारोळ्यात लोळविले. त्यानंतर आरोपी पळून गेला. 
दरम्यान, वादग्रस्त राजश्री टंडनची हत्या झाल्याचे आणि एका गरीब कुटुंबातील १५ वर्षाच्या मुलाने ही हत्या केल्याचे कळाल्याने परिसरातील नागरिकांचा रोष उफाळून आला. ताब्यात घेतलेल्या आरोपीला मुक्त करा, अशी जोरदार मागणी या भागातील जमावाने केली. त्यासाठी मध्यरात्रीपर्यंत मोठा जमाव गिट्टीखदान ठाण्याच्या समोर उभा हहोता. राजश्री ही खंडणीखोर होती, परिसरातील नागरिकांनी ती त्रास देत होती, असेही नागरिक  तेथे गेलेल्या पत्रकारांना सांगत होते. पहाटे २ वाजेपर्यंत हा जमाव ठाण्याच्या आजूबाजूला होता. 
दरम्यान, एका महिला वकिलाची हत्या झाल्याचे कळाल्याने पोलीस दलात प्रचंड खळबळ उडाली. गिट्टीखदानचे ठाणेदार राजेंद्र निकम, पोलीस उपायुक्त राकेश कलासागर, अतिरिक्त आयुक्त रंजनकुमार शर्मा, सहपोलीस आयुक्त शिवाजीराव बोडखे यांनी घटनास्थळी धाव घेतली. आरोपीचे नाव कळताच त्यांनी धावपळ करीत कोराडी परिसरातून आरोपीला ताब्यात घेतले. वरिष्ठ अधिकाºयांनी त्याला हत्येचे कारण विचारले. त्याची ठाण्यात चौकशी सुरू असतानाच राजश्री टंडनची हत्या झाल्याचे, गरीब कुटुंबातील दहावीच्या विद्यार्थ्याने केल्याचे कळाल्यानंतर या भागातील नागरिकांनी आरोपीच्या समर्थनार्थ पोलीस ठाण्याकडे धाव घेतली. त्याला मुक्त करा, अशी जमावाने मागणी केल्याने पोलीसही चक्रावले. त्यांनी आरोपीची चौकशी केल्यानंतर शनिवारी त्याची बाल सुधारगृहात रवानगी केली. दुसरीकडे राजश्रीच्या वृद्ध पतीने तिचा मृतदेह पोलिसांच्या ताब्यातून घेतल्यानंतर सदरमध्ये तिच्यावर अंत्यसंस्कार केले. 
आणखी दोघे ताब्यात -
दरम्यान, राजश्री टंडनची हत्या केल्यानंतर आरोपी स्वत:च्या घरी गेला. त्याने आपल्या आजोबाला झालेला प्रकार सांगितला. त्यानंतर रक्ताने माखलेले कपडे बदलून तो, त्याचे आजोबा आणि एक मित्र हे तिघे कोराडीकडे गेले. तेथे आरोपी एका ओळखीच्या घरी थांबला. आजोबा आणि मित्र स्कुटीने परत आले. हा घटनाक्रम उघड झाल्यामुळे पोलिसांनी ती स्कुटी जप्त केली. त्यानंतर शनिवारी रात्री ८ च्या सुमारास आजोबा आणि मित्राला पोलीस ठाण्यात आणले. वृत्तलिहिस्तोवर त्यांची चौकशी सुरू होती.

Web Title: Murder of controversial woman lawyer, minor accused reformer

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.