वैमनस्यातून गुन्हेगाराचा केला खून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 31, 2021 04:08 AM2021-03-31T04:08:52+5:302021-03-31T04:08:52+5:30
- मोक्षधाम येथील घटना, सूत्रधारासह आरोपीला अटक लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : मोक्षधाम घाट येथे पूर्ववैमनस्यातून गुन्हेगाराचा खून झाला. ...
- मोक्षधाम येथील घटना, सूत्रधारासह आरोपीला अटक
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : मोक्षधाम घाट येथे पूर्ववैमनस्यातून गुन्हेगाराचा खून झाला. धूलिवंदनाच्या दिवशी संध्याकाळी ही घटना घडली. पोलिसांनी आरोपींना अटक केली असून, लखन पप्पू गायकवाड (३२, रा. सरस्वतीनगर, धंतोली) हे मृताचे नाव आहे तर चेतन ऊर्फ बाबा मंडल (३०, रा. हिवरीनगर) व तन्मय ऊर्फ भद्या नगराळे (३०, रा. कौशल्यानगर) हे आरोपी आहेत.
लखन हा कुख्यात गुन्हेगार होता. तो दीड वर्षापासून मोक्षधाम घाट येथे सुलभ शौचालय व अवैधरीत्या पार्किंग चालवत होता. विशेष म्हणजे, मनपा अधिकाऱ्यांच्या सहकार्याने गुन्हेगार अशा तऱ्हेचे अवैध पार्किंग चालवत असतात. चेतन याच परिसरात चहाटपरी चालवत होता तर तन्मय वाहनचालक आहे. तो आपले वाहन त्याच अवैध पार्किंगमध्ये ठेवत होता. त्यामुळे, तो नेहमी सुलभ शौचालयातही येत होता. शौचालयाचा वापर केल्यावर तो शुल्क देत नव्हता. यामुळे लखनसोबत त्याचा दोन-चार वेळा वादविवादही झाला. दरम्यान, काही दिवसांपूर्वी लखनने तन्मयला शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिली होती. यामुळे तन्मय प्रचंड चिडला होता. त्याने चेतनसोबत संगनमत करून लखनचा प्रतिशोध घेण्याचा निर्णय घेतला. सोमवारी संध्याकाळी ६ वाजता आरोपींनी लखनसोबत दारू ढोसली. यावेळी त्यांनी लखनसोबत वादविवाद करण्यास सुरुवात केली. निश्चित योजनेअंतर्गत चाकूने वार करून त्याचा जीव घेतला आणि घटनास्थळावरून दोघेही पसार झाले. पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल करून आरोपींना अटक केली. चेतनच्या विरोधात यापूर्वीही खुनाचा प्रयत्न करण्यासह अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत. मोक्षधाम घाटवर नेहमीच गुन्हेगारांचा राबता असतो. येथे ठाण्याच्या परिसरातील अनेक गुन्हेगार सतत येत असतात. त्यांची मनपा अधिकारी, कर्मचारी आणि मोक्षधाम कर्मचाऱ्यांसोबत साठगाठ आहे. रात्रीच्या वेळी दारू आणि मादक पदार्थांच्या पार्ट्या येथे रंगत असतात. परिसरात यापूर्वीही खुनाच्या घटना घडल्या आहेत. गणेशपेठ पोलिसांनी या घटनेला गांभीर्याने घेतले आहे.
..................